Dhanjay Munde : दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर कृषिमंत्री धंनजय मुंडे यांनी घेतली बैठक; वाचा बैठकीतील महत्वाच्या गोष्टी

Dhanjay Munde
Dhanjay Munde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Dhanjay Munde : संपूर्ण मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर शेतकऱ्यांना दिलासा देणे, पिण्याच्या पाण्याचे, जनावरांच्या चाऱ्याचे आदी नियोजन करणे यासंदर्भात काल छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याबाबतची माहिती कृषिमंत्री धंनजय मुंडे यांनी दिली आहे.

या बैठकीस कृषिमंत्री धंनजय मुंडे यांच्यासह व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे, आ.सतिश चव्हाण तसेच कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विभागीय आयुक्त, आठही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कृषी विभागाचे अधिकारी, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभागाचे अधिकारी, पशु संवर्धन विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

मराठवाड्यात नांदेड व हिंगोली या दोन जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी असून उर्वरित संपूर्ण मराठवड्यामध्ये पावसाचा मोठा खंड असल्यामुळे खरीप पिके अडचणीत आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून त्यांना अंतरीम दिलासा मिळवून देण्यासाठी सर्व मंडळांमध्ये कृषी, महसूल विभागामार्फत पीकविमा कंपनीला सोबत घेऊन तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनास देण्यात आले आहेत.

अग्रीम पिक विमा असेल किंवा अंतरिम पीक विमा असेल याचा नुकसान भरपाई मध्ये शेतकऱ्याला मोठा आधार मिळतो. सध्याची मराठवाड्यावरील परिस्थिती ही संकटाची असून शेतकऱ्यांना अंतरिम दिलासा मिळावा यासाठी संबंधित सर्व पीक विमा कंपन्यांनी महसूल व कृषी विभागासोबत मिळून मंडळ व गावनिहाय पंचनामे येत्या सात दिवसांच्या आत पूर्ण करावेत, अशा सक्तीच्या सूचना संबंधितास दिल्या आहेत.

प्रत्येक जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तालुका स्तरापर्यंत जाऊन मराठवाड्यातील सर्वच तालुक्यांचा कंटिन्जन्सी प्लॅन येत्या आठ दिवसाच्या आत तयार करून सादर करावा असे निर्देश देखील कऋषीमंत्री धंनजय मुंडे यांनी दिले आहेत.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा सुवर्ण महोत्सव तसेच मराठवाड्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि सततच्या दुष्काळावर कायमस्वरूपी दीर्घकालीन उपाययोजना करणे या संदर्भात मराठवाड्यातील सर्व प्रतिनिधींच्या विनंतीवरून मंत्रिमंडळाची विशेष बैठक छत्रपती संभाजीनगर येथे पुढील महिन्यात घेण्यात येणार आहे, या विशेष बैठकीमध्ये मराठवाड्याला दीर्घकालीन फायदा देणाऱ्या अन्य सर्वच योजनांचे आराखडे तसेच रखडलेल्या कामांचे प्रस्ताव तयार करून संबंधित मंत्रिमंडळ बैठकी आधी सादर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि जलयुक्त शिवार टप्पा योजनांचा फायदा मराठवाड्याला होणार

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प त्याचबरोबर जलयुक्त शिवार टप्पा दोन या दोन्ही योजनांचा जास्तीत जास्त फायदा मराठवाड्याला होईल, यादृष्टीने या काळात नियोजन करण्यात यावे, तसेच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना तातडीने कार्यान्वित करून या योजनेतून करण्यात येत असलेल्या कामांचा मंडळनिहाय अहवाल दैनंदिन स्वरूपात मंत्रालयास पाठवण्यात यावा, असेही निर्देश देण्यात आलेत.

पावसाचा खंड दाखवण्यामध्ये देखील अनेक त्रुटी दिसून येत असून मानवी चुका आढळल्यास त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असे निर्देशही विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यातील सर्व लघु मध्यम व मोठ्या जलप्रकल्पांचे जलसाठे तपासून आगामी काळात गरज भासल्यास पिण्याचे पाणी राखून ठेवण्याबाबतही संबंधितांना सूचना देण्यात आल्या असून त्याचबरोबर गाळ पेऱ्याचा जास्तीत जास्त वापर करून आगामी काळात गरज पडू शकते या दृष्टीने जनावरांच्या चाऱ्याची ही सोय करून ठेवावी असेही संबंधितांना या बैठकीत निर्देश देण्यात आले असल्याची माहिती कृषिमंत्री धंनजय मुंडे यांनी दिली आहे.