हॅलो कृषी ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांमधील संबंध हे नेहमीच संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारे राहिले आहेत. विविध दहशतवादी कारवाया, आतंकवादी हल्ले, आपसी मतभेद, वाद अशा अनेक घटना सातत्याने सुरु असतातच. उरी, पुलवामा येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान सोबतचे व्यापारी संबंध स्थगित केले आहेत. सीमेवरचा तणाव हा कायम आहेच. मात्र तरीदेखील आता पाकिस्तान भारताकडून कापूस पीक आयात करणार असल्याची माहिती काही सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तान मध्ये वस्त्रोद्योग हे रोजगाराचे मोठे माध्यम आहे. वार्षिक जवळपास २३ ते २४ लाख हेक्टरवर कापसाची लागवड तेथे केली जाते. मात्र गेल्या २-३ वर्षात पाकिस्तान कापूस पिकाच्या लागवडीत मागे पडला आहे. त्यामुळे भारताकडून कापूस आयात केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
पाकिस्तानमध्ये किमान १२५ लाख गाठींची आवश्यकता असते. मात्र उत्पादन कमी असल्याने त्यांना २० लाख गाठींची कमतरता निर्माण झाली आहे. २०२०-२१ च्या हंगामात त्यांना हा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाच्या संकटातही वस्त्रोद्योग मात्र सुरळीत सुरु आहेत. चीनच्या कापडावर अमेरिकेने सध्या बंदी घातली आहे ज्यामुळे भारतासह व्हिएतनाम, तुर्की, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांना वस्त्रोद्योग क्षेत्रात चांगली संधी आहे. त्यामुळे आता या उद्योगांवर पाकिस्तान लक्ष केंद्रित करून आहे.
ब्राझील, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांच्या तुलनेत विचार करायचा झाल्यास भारताकडून कापसाची आयात पाकिस्तानला परवडणारी आहे. व्यापारावर स्थगिती येण्यापूर्वी पाकिस्तान भारताकडून १०० ते १२५ कोटी किलोग्रॅम सुताची आयात करत होता. आता एवढीच किंवा यापेक्षा अधिक आयात पुन्हा करणार असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान यांचे वित्तीय विषयांचे अब्दुल रझ्झाक दाउद यांनी भारताकडून कापूस आयातीबाबतचा मुद्दा उभा केला आहे. लवकरच यासंदर्भातला प्रस्ताव सादर केला जाणार आहे.