हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याच्या घटना वारंवार समोर येऊ लागल्या आहेत. अशीच एक घटना सोलापुरात देखील समोर आली आहे. सोलापुरातील मोहोळ तालुक्यात एका शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून बिबट्याने म्हशीच्या रेडकूला ठार केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या भागात बिबट्याची पुन्हा एकदा दहशत निर्माण झालीय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील भोयरे येथील गोरख जाधव यांच्या म्हशीच्या रेडकावर या बिबट्याने हल्ला केला, या हल्ल्यात रेडकाचा जागीच मृत्यू झालाय. दीड वर्षांपूर्वी देखील याच परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली होती आता त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसतेय. बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालाय मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच रात्रीच्या वेळी बाहेर फिरणे टाळावे, रात्री शेतात जावे लागल्यास शेतकऱ्यांनी समूहाने शेतीत जावे, रात्री बाहेर झोपू नये, तसेच जनावरांना बंदिस्त ठेवावे असं आवाहन वनपाल ज्ञानेश्वर साळुंखे यांनी केले आहे.