Soluble Fertilizer : या पद्धतीने करा पिकामध्ये विद्राव्य खताचा वापर

Soluble Fertilizer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हेलो कृषी ऑनलाईन : शेतकरी दाणेदार खताबरोबरच विद्राव्य खतांचा (Soluble Fertilizer) वापर आपल्या पिकांमध्ये करत असतात. मात्र कोणते विद्राव्य खत पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये वापरावे याची माहिती आपण जाणून घेऊया.

विद्राव्य खत (Soluble Fertilizer) वापरताना घ्यावयाची काळजी

विद्राव्य खताचा वापर करताना 200 लिटर पाणी घ्यावे. ही विद्राव्य खते ड्रीपने द्यायची असल्यास व्हेंचुरीचा वापर करणे आवश्यक आहे. ज्यावेळी पिकाला पाणी द्यायचे बंद करायचे आहे, त्याच्या शेवटच्या 15 मिनिटे आधी पिकाला ड्रीपद्वारे खते सोडावीत. यानंतर पुन्हा 5 ते 10 मिनिटे पाणी द्यावे. खते ड्रीपद्वारे द्यायची असल्यास सकाळी 7 ते 9 या वेळेत द्यावी.

पिकाच्या अवस्थेनुसार कोणती खते (Soluble Fertilizer) द्यावी?

19:19:19 : पिकाच्या पहिल्या अवस्थेत म्हणजेच पिकाच्या मुळांची वाढ किंवा शाखीय वाढीसाठी हे विद्राव्य खत पिक लागवडीनंतर 2 ते 3 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करु शकता. तसेच हे खत ड्रीपद्वारे द्यायचे असल्यास दीड ते दोन किलो प्रतिएकर हे खत वापरावे. पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत ही खताची ग्रेड वापरली जाते, त्यामुळे या विद्राव्य खताला स्टार्टर ग्रेड असे म्हटले जाते.

12:61:00 : पिकवाढीच्या पहिल्या अवस्थेमध्ये 12:61:00 ही खताची ग्रेड वापरता येते. मुळांच्या वाढीसाठी, फुटव्याची संख्या वाढवण्यासाठी या खताचा वापर केला जातो. हे विद्राव्य खत ड्रीपद्वारे, फवारणीद्वारे किंवा आळवणीद्वारे वापरता येते.

00:52:34 : पिकाच्या दुसऱ्या अवस्थेसाठी म्हणजेच फुलोरा अवस्थेसाठी 00:52:34 या खताचा वापर करावा. या विद्राव्य खतात स्फुरद आणि पालाशचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पिकाची फुलोरा अवस्था किंवा फुलोऱ्यानंतरची अवस्थेमध्ये देखील या खताचा वापर करता येतो.

13:00:45 : पिकाच्या पक्वता अवस्थेमध्ये म्हणजेच तिसऱ्या अवस्थेमध्ये 13:00:45 या खताचा वापर करता येतो. अवर्षणग्रस्त भागामध्ये पिकाचा ताण कमी करण्यासाठी हे खत वापरता येते. तसेच पिकाला पक्वता आणण्यासाठी या खताचा उपयोग होतो.

00:00:50 : या विद्राव्य खतामध्ये पालाशबरोबरच गंधकाचे प्रमाण असते. परिपक्वतेच्या अवस्थेत किंवा फळाचा आकार वाढवण्यासाठी हे विद्राव्य खत उत्तम मानले जाते.

विद्राव्य खतांचा वापर भरमसाट करू नये. मोजक्या स्वरूपात मात्र वारंवार देण्याचा प्रयत्न करावा. ही खते देताना दोन खतांमधील अंतर 5 ते 6 दिवसांचे असावे. विद्राव्य खते एकमेकांत मिसळू नयेत.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.