हेलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना सिंचनासाठी, दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 (MSKVY) राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी, सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू आहे.
या योजनेंतर्गत (MSKVY) 790 शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा
कोल्हापूर जिल्ह्यातील हरोली या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प (MSKVY) कार्यान्वित झाला आहे. हरोली येथे हा प्रकल्प अवघ्या सहा महिन्यात कार्यान्वित झाला असून त्यामुळे हरोली आणि जांभळी या गावातल्या 790 शेतकऱ्यांना शेतीसाठी, दिवसा वीज पुरवठा सुरु झाला आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 54 ठिकाणी आणि सांगली जिल्ह्यात 34 ठिकाणी सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे. वीज ग्राहक आणि शेतकरी या दोघांसाठीही सौर ऊर्जा प्रकल्प हे फायदेशीर ठरणार आहेत. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या पर्यावरणपूरक विकास कामात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.