हॅलो कृषी ऑनलाईन । पंढरपूर येथील शेतकरी कुबेर चिमाजी घाडगे यांनी आज सकाळपासून प्रशासन हलवून सोडले आहे. आपल्या मागणीसाठी एक वेगळाच मार्ग अवलंबत त्यांनी चक्क टॉवर वर चढून उपोषणाला सुरुवात आहे. ज्यामुळे ज्यामुळे प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासन यांची चांगलीच दमछाक झाली आहे. कुबेर यांनी जिल्हाधिकारी व न्यायालयाने हुकूमनाम्यामध्ये एक वादी व सहा प्रतिवादी असताना कुणाचा वाटप तक्ता तयार करण्याबाबत व नोंद देण्याबाबत आदेश केला होता. या आदेशाची नक्कल मिळावी या मागणीसाठी प्रांत कार्यालयातील टॉवरवर चढून हे उपोषण सुरु केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील देगाव येथील कुबेर घाडगे यांच्या या कृतीची चांगलीच चर्चा होते आहे. उप-विभागीय अधिकारी तथा उप -विभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यलयासमोर त्यांनी हे उपोषण सुरु केले आहे. या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी तसेच पोलिसांनी धाव घेतली असून त्यांची समजूत काढली जाते आहे.
आज (सोमवारी) सकाळीच हे शेतकरी टॉवरवर चढल्याने प्रशासनाची मात्र धावपळ उडाली आहे. याठिकाणी पोलिस,तहसीलदार पोहोचले असून उपोषण कर्ते चिमाजी घाडगे यांच्याशी उपोषण स्थगित करण्यासंदर्भात फोनद्वारे विनवणी सुरू आहे. शेतकरी कुबेर चिमाजी घाडगे हे जवळपास १०० फूट टॉवरवर चढले आहेत. सोबत त्यांनी मोबाईल व पिशवी ठेवली आहे. त्यांच्याशी बोलून त्यांना हे उपोषण मागे घेण्यास विनविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.