हॅलो कृषी ऑनलाईन: यावर्षी लहरी हवामानामुळेजांभळांचे (Jamun Market Rate) उत्पादन घटल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात जांभळांचे दर वाढले आहे. सध्या जांभूळ दराच्या बाबतीत हापूस आंब्याला टक्कर देत आहेत. फळ बाजारात एक डझन हापूस आंबे 400 रुपयाने विक्री होत आहेत, तर जांभळाची विक्री (Jamun Market Rate) सुद्धा 400 ते 450 रुपये किलो दराने सुरू आहे.
उन्हाळ्यात रानमेव्याला खरेदीदारांकडून चांगलीच मागणी असते. रानमेवा बाजारातील आवकही वाढली आहे. त्यातीलच एक रानमेवा म्हणजे जांभूळ (Jamun), गोड-तुरट जांभळे सध्या शहरातील विविध फळ विक्रेत्यांकडे विक्रीला आली आहेत. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत जांभळाच्या दराने (Jamun Market Rate) ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.
पिंपरी-चिंचवड मार्केटमध्ये लोणावळा, खंडाळा येथून जांभळांची आवक होते (Jamun Market). यंदा 15 ते 20 दिवस उशिराने हंगाम सुरू झाला. लहरी हवामानामुळे उत्पादन (Jamun Production) मोठ्या प्रमाणात घटल्याने बाजारात जांभळांची आवक घटली आहे.
सध्या बाजारात मध्यम आकाराच्या स्थानिक जांभळांना (Local Jamun Variety) प्रति किलो 300 ते 400 रुपये दर मिळत आहे. तर, लहान जांभळांना 300 रुपये दर मिळत आहे. दर्जेदार जांभळांना (Quality Jamun) 400 ते 450 रुपयांपर्यंत दर (Jamun Market Rate) मिळत असल्याचे जांभूळ विक्रेते सांगत आहेत.
वेगवेगळ्या जांभळांची वैशिष्ट्ये?
स्थानिक जांभूळ – पातळ साल, कमी टिकवणक्षमता असलेली ही जात गुजरातच्या तुलनेत अधिक गोड आहे, त्यामुळे या जांभळांना राज्यात मोठी पसंती मिळते.
कर्नाटक, गुजरातची लालसर जांभळे (Red Jamun) – या जांभळांची साल जाड असते. जाड सालीमुळे टिकवणक्षमता अधिक राहते. गोडीलाही चांगली असतात. या जांभळांना मोठी पसंती मिळते.
गुजरातच्या जांभळाची आवक घटली
दरवर्षी एप्रिलच्या शेवटी बाजारात गुजरात, कर्नाटक राज्यातून जांभळाची मोठ्या प्रमाणात आवक होते. पण, यंदा गुजरातमधून जांभळाची आवक अत्यंत कमी प्रमाणात होत आहे, तर कर्नाटकातून येणाऱ्या जांभळाची आवक अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक भागातून जांभळे बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहेत.