हेलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी लासलगाव येथील बाजार समितीला (Lasalgaon Market Committee) भेट दिली. सन २०२४ च्या खरीप हंगामातील कांदा पिकाचं क्षेत्र, अंदाजित उत्पादन, बाजारातील आवक, बाजारभाव आणि निर्यात विषयक धोरण त्याचबरोबर शेतकरी आणि व्यापारी वर्गाच्या अडीअडचणींबाबत चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लासलगाव बाजार समितीला काल भेट दिली, असल्याचे सांगण्यात आले आहे.
लासलगाव बाजार समितीच्या (Lasalgaon Market Committee) संचालकांनी केली ही मागणी
खरीप कांद्याची नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या इतर भागात मोठया प्रमाणात लागवड झाली असून नवीन लाल कांदा लवकरच विक्रीला येणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाने कांदा निर्यातीवरचं २० टक्के निर्यात शुल्कं कमी करावे तसेच जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी व्यापाऱ्यांना वाहतुकीवर अनुदान द्यावे, असे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी शिष्टमंडळाला सांगितलं.
अफगाणिस्तानचा कांदा भारतात दाखल
केंद्र सरकारने कांदा दर नियंत्रणासाठी अफगाणिस्तानचा टन कांदा आयात केल्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला आहे. यंदा पावसाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. चाळीमध्येही शेतकऱ्यांचा कांदा शिल्लक आहे, अशा परिस्थितीत हा कांदा आयात करू नये तसेच सरकारने कांदा आयातीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.