Mukhyamantri Majhi Ladki Bahin: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक करणार्‍यावर कठोर कारवाई करा! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Majhi Ladki Bahin) योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, फॉर्म भरून घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.

योजने संदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करून देणे किंवा फॉर्म भरून देण्याचे निमित्त करून निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

योजनेसाठी (Mukhyamantri Majhi Ladki Bahin) नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे तसेच त्यानंतर योजनेचा फॉर्म भरणे इत्यादी संपूर्ण प्रक्रिये संदर्भात काल विधानभवन येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलदगतीने होईल यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

माता-भगिनींचे आयुष्य बदलवून टाकणार्‍या अनेक योजना राज्य शासनाने आणल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Majhi Ladki Bahin) योजनेचा शासन निर्णयही लगेचच काढण्यात आला. या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला 18 हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. यासाठी 46 हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. ही योजना म्हणजे माता-भगिनींना माहेरचा आहेर आहे. नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही या दृष्टीने चोख नियोजन करावे, लाडक्या बहि‍णींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.