Onion Subsidy : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण, 3 लाख शेतकऱ्यांना 300 कोटी रुपये अनुदान वितरित होणार

Onion Subsidy
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Onion Subsidy : राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला.

पहिल्या टप्प्यात तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपये एवढा निधी ऑनलाईन वितरित होणार आहे. उर्वरित अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कांदा अनुदानासाठी १० कोटी पेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, जालना, वाशिम या जिल्ह्यातील पात्र लाभार्थींच्या थेट बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे.

कांदा अनुदानासाठी दहा कोटी पेक्षा जास्त मागणी असलेले नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, बीड या जिल्ह्यातील पात्र लाभार्थीच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १० हजार पर्यंत सर्वांना अनुदान जमा होईल. ज्या शेतकऱ्यांची १० हजार पर्यतची देयक आहेत त्यांना पूर्ण अनुदान मिळणार आहे. ज्या लाभार्थीचे देयक १० हजार रुपये पेक्षा जास्त आहे त्या लाभार्थीच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १० हजार रुपये अनुदान जमा होणार आहे.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.