मुंबई : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सध्या २० लाख रुपयांची मदत दिली जाते. त्यात वाढ करून ती २५ लाख रुपये केली जाणार आहे. याबाबतची फाइल तयार असून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत जाहीर केले.

महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
पन्हाळा शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जंगलानजीक असणाऱ्या शेतातील पिकांचे गवारेड्यांकडून नुकसान होत असल्याप्रकरणी आमदार डॉ. विनय कोरे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना वनमंत्री मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. वन्यप्राण्यांमुळे झालेल्या हानीबाबत नुकसान भरपाईचे विधेयक विधानसभेने संमत केले असून त्यात ३० दिवसांच्या आत नुकसान भरपाई दिली नाही तर त्यानंतर व्याज देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
याशिवाय गाय, म्हैस, बैलाच्या मृत्यूनंतर जनावराच्या मालकाला १० हजाराची मदत मिळत होती, ती आता ७० हजार रुपये केली आहे. तसेच शेत पिकांच्या नुकसान भरपाईची मदतही वाढवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.