हॅलो कृषी ऑनलाईन : रक्षाबंधनचा सण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या या सणाकरिता राखी खरेदी करण्याची मोठी लगबग बाजारात सुरु आहे. सध्या इकोफ्रेंडली राख्यांना मोठी पसंती मिळत आहे. अशात बांबूंपासून मेळघाटातील महिलांनी तयार केलेल्या राख्यांना केवळ देशातूनच नाही तर परदेशातूनही मोठी मागणी आहे.
राख्यांना परदेशातही मागणी
नैसर्गिक साधनांपासून बनवलेल्या बांबूराखीला देशातच नव्हे, तर ६० देशांतही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. आतापर्यंत ६० हजार राख्या जपान, अमेरिकेसह ६० देशांत पोहोचविण्यात आल्या आहेत. मेळघाटात आता हा राख्या बनवण्याचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालला असून केवळ रक्षाबंधन पुरतेच नव्हे तर संपूर्ण वर्षभर मेळघाटतील महिलांना राख्या बनवण्याचा रोजगार मिळाला आहे. आतापर्यंत एक लाखाहून अधिक राख्या बनवून बाजारात विक्रीसाठी पाठविल्या आहेत. लोकांचा प्रतिसाद पाहता शाळकरी मुलांसाठी राखी बनविण्याची किट तयार केल्या आहेत. त्यांनाही राखी बनविणे शिकविले जात आहे.

मोदींना बांधली होती बांबू राखी
सुनील देशपांडे यांनी १९९७ साली संपूर्ण बांबू केंद्राची स्थापना केली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी डॉ. निरुपमा देशपांडे हे कार्य सांभाळत आहेत. २०१८ साली मेळघाटातील बांबूपासून बनवलेली राखी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधली होती. त्यानंतर मिळालेली प्रसिद्धी आणि आयसीएआर यांच्या सहयोगाने विदेशातही राखी पाठविण्याचा कार्यक्रम सुरू झाला.बांबू केंद्राच्या संचालक डॉ. निरुपमा देशपांडे म्हणाल्या, ‘‘ऑनलाइन राख्यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. नागपुरातही लोक जास्तीत जास्त ऑनलाइन राख्या मागवीत आहेत.’’