हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) : यंदाच्या मार्च महिन्यापासून अधूनमधून का होईना महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. ज्या भागाला दुष्काळग्रस्त म्हटलं जात होतं त्याच भागात अवकाळी पाऊस हजेरी लावू लागला आहे. काल देखील विदर्भातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने (Weather Department) वर्तवला होता. आज (ता .५) मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पाऊस ( Unseasonal Rain) राहील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस असून या व्यतिरिक्त इतर भागात कोरड्या हवामानात उन्हाचा कायम चटका लागणार असून हे वातावरण कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितलं आहे. काल मंगळवार ( ता. ४ ) या दिवशी वर्धा तसेच अकोल्यात ३९ अंश सेल्सिअस तापमान होते. कोकण भाग वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान ३५ ते ३९ अंश दरम्यान होते. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता असण्याचे नेमके कारण पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे. Weather Update
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता, काय आहे नेमकं कारण?
झारखंड ते ओडिशा, आंध्र प्रदेश ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा आणि खंडित वाऱ्यांची परीस्थिती सध्या पहायला मिळत आहे. राजस्थानातील काही भाग आणि इतर परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांमध्ये काही अंशी प्रमाणात घट पहायला मिळत आहे. यातच राज्यात पावसाला पोषक हवामान मिळत आहे.