Agriculture News : शेतकरी पाणी शिंपडून पिकाचा जीव वाचवायचा करतायेत प्रयत्न; पावसाअभावी पाण्याची परिस्थिती बिकट

Agriculture News
Agriculture News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharastra Rain : राज्यात यावर्षी मान्सून उशिरा दाखल झाला. जून महिन्याच्या शेवटी थोडाफार पाऊस पडला त्यानंतर जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली. जुलै महिन्यात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या मात्र ऑगस्ट महिना सुरू होताच पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीप पिके धोक्यात आहेत. सध्या अनेक शेतकरी पिकाला पाणी नसल्यामुळे चिंतेत आहेत. पुणे जिल्ह्यात देखील पाण्याची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे या ठिकाणचे शेतकरी चिंतेत आहेत

यंदा पाऊस नसल्यामुळे खरीप पिकाचे मोठे नुकसान होण्याचा धोका आहे. तसेच थोडे थोडे पाणी शिंपडून पिकाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतोय अशा शब्दात पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात 21 ऑगस्ट अखेर 88 टक्के पेरणी झाली. गेल्या वर्षी ती 99% एवढी होती त्यामुळे यंदा खरीप हंगाम सुरुवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिल्याने धोक्यात आला असल्याचे दिसत आहे.

शेतकऱ्यांची पिके सुकली

जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे. काही शेतकरी पिकांवर ट्रॅक्टर फिरवत आहेत. तर काही शेतकरी पिकांना तांब्याने पाणी देत असल्याचे देखील दिसत आहेत. फळबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. टँकर विकत घेऊन शेतकरी फळबागेला पाणी देत असल्याचे चित्र पुणे जिल्ह्यामध्ये दिसत आहे.

यावर्षी पुणे जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिना संपत आला तरी सरासरीच्या अवघ्या 39 टक्के पाऊस झाला आहे. याच काळात गेल्या वर्षी 142 टक्के पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे यंदा 13 पैकी आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेती सोबतच जनावरांच्या खाण्याचा प्रश्न देखील उपस्थित राहिला आहे. त्यामुळे चारा छावण्या सुरू करण्याची मागणी पशुपालक आणि शेतकऱ्यांनी केली आहे.