हॅलो कृषी ऑनलाईन : हिवाळ्यात केवळ माणसालाच नाही तर जनावरे (Animal Diseases) आणि पिकांना देखील थंडीचा त्रास होत असतो. थंडीच्या दिवसांत पडणाऱ्या दवामुळे पिकांच्या पानांवर एक बर्फ स्वरूपात एक थर जमा होतो. तर जनावरांच्या आरोग्यावर देखील दव आणि थंडीचा परिणाम दिसून येत असतो. ज्यामुळे या काळात जनावरांना अनेक आजार बळावण्याची शक्यता असते. या दवांमुळे जनावरांना न्यूमोनिया (Animal Diseases) हा आजार होण्याची दाट शक्यता असते.
काय आहे न्यूमोनिया आजार? (Animal Diseases Protect Pneumonia)
न्यूमोनिया (Animal Diseases) हा आजार प्रामुख्याने जनावरांना फुफ्फुसांच्या संसर्गामुळे होतो. तो कोणत्याही जनावराला होऊ शकतो. थंडीच्या काळात हवेमध्ये असलेले जिवाणू आणि विषाणू श्वासाद्वारे जनावरांच्या फुफ्फुसात जातात. जर एखाद्या जनावराला आधीच फुफ्फुसाचा आजार, हृदयविकार असा कोणताही आजार झाला असेलतर तर त्या जनावराला सध्याच्या थंडीच्या वातावरणात गंभीर संसर्ग होण्याचा धोका असतो. जनावरांना होणाऱ्या या संसर्गालाच न्यूमोनिया असे म्हणतात.
श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो
न्यूमोनिया या आजारामुळे जनावराचे एका बाजूचे किंवा दोन्ही बाजूचे फुफ्फुसे कफने भरली जातात. अशा परिस्थितीत जनावरांना फुफ्फुसांच्या माध्यमातून ऑक्सिजन घेण्यास त्रास होऊ लागतो. जीवाणू पासून झालेल्या न्यूमोनियामुळे होणारा जनावरांचा हा त्रास दोन ते चार आठवड्यात बरा केला जाऊ शकतो. तर विषाणूमुळे होणारा न्यूमोनिया बरा होण्यास जास्त वेळ लागू शकतो.
न्यूमोनियाची लक्षणे?
लहान जनावरांमध्ये न्यूमोनियाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. त्यामुळे अशा थंडीच्या परिस्थितीत लहान जनावरे आजारी असल्यास त्यांना न्यूमोनिया झालेला असू शकतो. समजा जनावराला सर्दी, खूप ताप, खोकला, थरथर कापत असेल तर ही न्यूमोनियाची सर्वसामान्य लक्षणे मानली जातात. याशिवाय जनावरांमध्ये अंगदुखी, स्नायू दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा गोष्टी दिसून येत असतील तर ही सुद्धा जनावरांना होणाऱ्या न्यूमोनियाची लक्षणे आहेत.
असे करा संरक्षण
- जनावरांचा गोठा या नेहमी स्वच्छ ठेवावा. जनावरांच्या गोठ्यामध्ये सूर्याची किरणे पडतील किंवा हवा खेळती राहील अशी गोठ्याची रचना असावी.
- जनावरांना नेहमी गरम वातावरणासाठी ठेवण्यासाठी त्यांना बारदानाने पाठीवर झाकण्याची व्यवस्था करावी.
- जनावरांमधील न्यूमोनियाचा इलाज हा डॉक्टरांच्या देखरेखी खाली घरच्या घरी केला जाऊ शकतो.
- सामान्यतः डॉक्टरांच्या सल्ल्याने तोंडाद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रतिजैविकांचा वापर करावा.
- यामध्ये प्रामुख्याने टेट्रासाइक्लिन सारखे प्रतिजैविक हे 15-20 मिलीग्रॅम/किलोग्रॅम वजनाच्या तुलनेत द्यावे. याशिवाय स्ट्रोटोपेनिसिलिन हे जनावरांच्या वजनाच्या तुलनेत मिलीग्रॅम/किलोग्रॅम यासोबतच क्लोक्सासिलिन 7-10 मिलीग्रॅम युक्त औषधे देणे गरजेचे असते.
- डेक्सामेथासिनसारखे स्टिरॉइड मोठ्या जनावरांना 5 मिली तर लहान जनावरांना 2-3 मिली इतक्या प्रमाणात द्यावे.
- एंटीहिस्टामाइन आणि एनाल्जेसिक आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावे.
(याशिवाय ब्रोन्कोडिलेटर आणि कफ दूर करणारी आयुर्वेदिक औषधे देखील जनावरांना याच पद्धतीने दिली जावी. (यामध्ये ब्रुकोप्राइटिर – 30 ते 40 ग्रॅम दोन वेळा, कैसलोन – 50 ते 60 ग्रॅम दोन वेळा, कोफलेक्स – 40 ते 50 ग्रॅम दोन वेळा)