Fake Fertilizer: पुण्यातील ‘या’ कंपनीने खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना माती विकून, 50 लाखांचा लावला चुना!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: एका खत कंपनीने (Fertilizer Company) 3400 बॅग बनावट खत (Fake Fertilizer) विकून शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे.

पुणे (Pune) येथील रामा फर्टिकेम (Rama Fertichem) कंपनीने गुजरातमध्ये उत्पादित होणाऱ्या डीएपी व एनपीके 10:26:26 या रासायनिक खताच्या नावाखाली चक्क दाणेदार माती (Soil) अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Amravati Farmers) विकल्याचे उघड झाले आहे. या खतांचे नमुने अहवाल अप्रमाणित आले आहेत. सहा तालुक्यांत विकल्या गेलेल्या 3400 बॅग बनावट खतातून (Fake Fertilizer) कंपनीने शेतकऱ्यांना किमान 50 लाखांचा चुना लावला आहे.

डीएपी या रासायनिक खताची 50 किलोची बॅग 1350 रूपयांना व एनपीकेची बॅग 1470 रूपयांना बाजारात विकली जाते. अनेक शेतकरी पेरणी सोबतच या खताची मात्रा देतात. त्यामुळे रासायनिक खताच्या नावावर चक्क माती विकून या कंपनीने शेतकर्‍यांची फसवणूक (Deception Of Farmers) केल्याने शेतकऱ्यांना खतांचे पैसे परत मिळायला पाहिजे, अशी मागणी होत आहे.

कृषी उपसंचालक उज्ज्वल आगरकर यांनी मंगरूळ चव्हाळा येथील एका कृषी केंद्रातून एनपीकेचा नमुना व जिल्हा कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांनी मार्डा येथील कृषी केंद्रातून डीएपीचा नमुना घेऊन तपासणीला पाठवला होता.

अहवाल अप्रमाणित आल्याने कंपनीचा गोरखधंदा उघडकीस आला. यानंतर एसएओ राहुल सातपुते यांच्या निर्देशान्वये जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सागर डोंगरे यांनी शहर कोतवालीत सोमवारी रात्री तक्रार दाखल केली. त्यावरून कंपनीचे जबाबदार अधिकारी विकास नलावडे (४८, काष्ठी-श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याच्या विरुद्ध फसवणुकीसह खत (Fake Fertilizer) नियंत्रण कायद्यान्वये विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.