हेलो कृषी ऑनलाईन : पशुपालनामध्ये पशुखाद्य (Animal Feed) हा महत्त्वाचा घटक मानला जातो. दिवसेंदिवस पशुखाद्याच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. खासकरून दुभत्या जनावरांना दूध (milk) वाढण्यासाठी, तसेच शरीराची झीज भरून काढण्यासाठी पशुखाद्य दिले जाते. पशुपालनामध्ये चाऱ्याव्यतिरिक्त (Fodder) पशुखाद्यासाठी पशुपालकांना बराच खर्च येतो. मात्र पशुपालकांनी जनावरांना पशुखाद्य भिजवून द्यावे की सुके हे आपण जाणून घेऊया.
पशुखाद्यातील (Animal Feed) घटक
पशुखाद्यामध्ये पचनीय पदार्थांचे प्रमाण हे 75 ते 80 टक्के असते, तसेच प्रथिने, कर्बोदके तसेच पिष्टमय पदार्थ जास्त असतात. जर पशुखाद्य भिजवले तर त्यामध्ये बुरशी वाढण्याची व बुरशीजन्य विष तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक तज्ज्ञ पशुखाद्य भिजवून देऊ नये असे सांगतात. परंतु पारंपरिक पद्धतीमध्ये अनेक शेतकरी आंबवण करून देतात.
पशुखाद्य (Animal Feed) आंबवण करुन दिल्याने होणारे दुष्परिणाम
– जनावरांना दिला जाणारा भरडा हा रात्रभर भिजू घातल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर यीस्ट म्हणजेच एकपेशीय बुरशीची वाढ होते. त्यामुळे असे पशुखाद्य जनावरांना दिल्यास बुरशीजन्य विषबाधा होऊ शकते.
– जास्त वेळ भिजत घातलेले पशुखाद्याचे भांडे किंवा हौद चांगल्या प्रकारे स्वच्छ न केल्यास त्या भांड्यामध्ये बुरशी वाढते.
– सरकीमध्ये अनेकदा लोखंडाचे तुकडे आढळतात. त्यामुळे सरकी भिजवल्यास त्यात लोखंडाचे तुकडे असल्यास आपल्या हाताला आढळतात. त्यामुळे बरेचसे पशुपालक जनावरांना अशा प्रकारे सरकी भिजवून देण्यास प्राधान्य देतात.
– पीठ किंवा भरडा या स्वरूपातील पशुखाद्य जनावरांना कोरड्या स्वरूपात दिल्यास जनावरांना ठसका लागण्याची शक्यता असते, म्हणून बरेच पशुपालक हा भरडा जनावरांना भिजवून देतात. भिजवल्यामुळे भरड्याचे आकारमान वाढते त्यामुळे जनावरांच्या पोटाचा आकार वाढतो. त्यामुळे जनावरांची चारा खाण्याची क्षमता कमी होते. तसेच अशा पशुखाद्यात पाणी जास्त टाकल्यास जनावरांच्या पोटात पाण्याचे प्रमाण जास्त होऊन चारा खाण्याचे प्रमाण कमी होते व दुग्धउत्पादन कमी होते.
– भिजवलेल्या पशुखाद्यात बाहेरच किण्वण प्रक्रिया झाल्याने असे पशुखाद्य जनावरांनी खाल्ल्यास पोटामधील आम्लता वाढते. अशी आम्लता वाढत राहिल्याने दुभत्या जनावरांना खुराचे तसेच कासेचे आजार होतात.
– जनावरांना पशुखाद्य जास्त भिजवून तसेच त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यास असे पशुखाद्य जनावरांनी खाल्ल्यास पोटातील उष्णता कमी होते. तसेच पोटातील जिवाणू अचानक थंड पाणी आल्याने मृत पावतात. पोटातील सूक्ष्मजीव कमी झाल्याने अपचनाचा धोका निर्माण होतो.
पशुखाद्य कसे द्यावे?
– जनावरांना सरकी भिजवून घालायची असेल तर रात्रभर न घालता फक्त दोन ते अडीच तासच भिजवून खायला घालावी. सरकीमध्ये लोखंडाचे तुकडे असण्याची शक्यता असते, त्यामुळे हाताने किंवा लोहचुंबकाच्या साह्याने लोखंडाचे तुकडे काढून नंतरच जनावरांना ते पशुखाद्य द्यावे. सरकी भिजवताना स्वच्छ धुतलेले भांडे वापरावे.
– पीठ किंवा भरडा दिल्याने जनावरांना ठसका लागण्याची शक्यता वाटत असल्यास असे पीठ किंवा भरड्यामध्ये थोडेसे पाणी शिंपडून जनावरांना द्यावे. त्यामध्ये पूर्ण पातळ किंवा भिजवण्यापेक्षा फक्त ठसका लागणार नाही, अशा पद्धतीने ओलसर करून जनावरांना द्यावे.
– बाजारात मिळणारे पशुखाद्य गोळी पेंड किंवा कांडी पेंड ही जनावरांना भिजवून देण्याची गरज नाही. कारण गोळी पेंड किंवा कांडी पेंड खाताना जनावरांना ठसका लागत नाही.
– पशुखाद्याचे भांडे किंवा हौद स्वच्छ धुवून वापरावे.