हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्रात थंडीच्या कडाका वाढला आहे. त्यामुळे आपण तर स्वतःची काळजी घेतो मात्र त्याचप्रमाणे आपल्या पशुधनाची काळजी घेणे आवश्यक आहे. मध्यंतरी गारठ्यामुळे मेंढपाळांच्या मेंढ्या मृत्युमुखी पडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे इतर जनावरांबरोबरच शेळ्या मेंढ्या यांचा देखील थंडीपासून बचाव कसा करता येईल जाणून घेऊया…
–किमान तापमानात घट होऊन तूरळक ठिकाणी शीत लहरीची शक्यता असल्यामूळे थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल.
— तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत.
–राज्याच्या काही भागात लाळ्या खुरकूत रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे त्यामुळे त्याचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.
–थंडीच्या दिवसात प्राण्यांच्या आहारात खनिज आणि क्षारांचे विहित प्रमाण असणे गरजेचे आहे. यासाठी जनावरांना सारखा हिरवा चारा द्यावा. तसेच त्या सोबत तृतीयांश कोरडा चारा सुद्धा देणे गरजेचे आहे.
— थंडीच्या दिवसात वासरांना खोकला, न्यूमोनिया, खोकल्याशी संबंधित आजार असल्यास पशुवैद्यांचा सल्ला घेऊनच जनावराला औषध द्या. तसेच दुभत्या जनावरांना या आजारापासून वाचवण्यासाठी दूध काढल्यावर त्यांच्या कास जंतुनाशकाने धुवावी आणि स्वच्छ करावी.
–थंडी च्या दिवसांमध्ये गुरांच्या नाकातून आणि डोळ्यांतून पाणी येणे तसेच भूक कमी होणे, जनावरे थरथर कापणे अश्या प्रकारची लक्षणे आपल्याला दिसतात. थंडीच्या दिवसात जनावरांच्या गोठ्यात कोरडे वातावरण ठेवावे. तसेच गोठ्यामध्ये स्वच्छता करावी.तसेच जंतुनाशके गोठ्यात फवरावी आणि गोठ्याची स्वच्छता करावी, जेणेकरून जनावरे आजारी पडणार नाहीत. तसेच जनावरांना स्वच्छ पाणी आणि सुका चारा द्यावा. ओल्या चाऱ्याचे प्रमाण कमीच ठेवावे.