ऊस पिकासाठी पाण्याचा अपव्यय टाळा, ठिबक सिंचन ठरेल प्रभावी पद्धत

Sugarcane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उसाची शेती करताना बहुतेक शेतकरी उसाला पाणी देण्यासाठी पारंपरिक प्रवाही पाट (सरी-वरंबा)पद्धतीचा वापर करतात. पण त्यामुळे होणारा पाण्याचा अनावश्यक वपार टाळण्यासाठी ठिबक सिंचन ही पद्धती उपयुक्त ठरते.

ठिबक सिंचन पद्धतीने कमी अंतराने म्हणजेच दर दिवशी अथवा एक दिवस आड कमी प्रवाहाने परंतु जास्त कालावधीसाठी पाणी दिल्यास जमिनीमध्ये पिकांच्या मुळाशी पाण्याचे अपेक्षित व योग्य प्रकारे उभे-आडवे प्रसारण होते आणि मुळांची वाढ चांगली खोलवर होते त्यामुळे ऊस पिकाची जोमदार वाढ होऊन भरी उत्पादन मिळते यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची निवड करणे, दोन ठिबक नळ्यांमध्ये योग्य अंतर व ड्रीपरचा प्रवाह निश्चित करणे महत्त्वाचे आहे. कमी कालावधी मध्ये सिंचन पूर्ण करण्यासाठी जास्त प्रवाह असणारे ड्रीपर वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो परंतु हे शास्त्रीय दृष्टिकोनातून चुकीचे आहे.

उसासाठी ठिबक सिंचन

– याकरिता शक्यतो सोळा मिलिमीटर व्यासाची इनलाईन ड्रीप वापरावी
– मध्यम खोल जमिनीत दोन ठिबक सिंचन नळ्यातील अंतर कमीत कमी 1.50 मीटर (5फूट)असावे तर जास्तीत जास्त खोलीच्या काळ्या जमिनीत दोन ठिबक सिंचन नळ्यातील अंतर 1.80 मिटर (6फूट ) असावे.
– दोन ड्रीपर मधील अंतर 40 सेंटिमीटर व प्रवाह ताशी 1.6 किंवा दोन लिटर असावा.
– भूमिगत ठिबक सिंचनासाठी दाब नियंत्रित इनलाईन ड्रीपर करावी. दोन ड्रीपर मधील अंतर 40सेमी तर ड्रीपरचा प्रवाह दर ताशी1.6 किंवा 2 लिटर असावा. एका शिफ्टमध्ये जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी ताशी एक लिटर प्रवाह देणारे ड्रीपर असणारी इनलाईन वापरणे फायदेशीर ठरते.

प्रवाही पद्धतीच्या तुलनेत ठिबक सिंचनचे फायदे

– या पद्धतीत वाढीच्या अवस्थेनुसार पाणी आणि खतांचे योग्य नियंत्रण करता येते.
– जमिनीमध्ये पिकाच्या मुळ्या पाशी अन्न पाणी व हवा यांचे संतुलित प्रमाणात ठेवणे शक्य होते.
– उसाची उगवण लवकर म्हणजे पंचवीस ते तीस दिवसात एक सारखी व जास्त प्रमाणात होते
– प्रचलित सरी-वरंबा पद्धतीच्या तुलनेमध्ये पाण्यात 45 ते 50 टक्के बचत होते.
– पाणी वापर कार्यक्षमता दुप्पट ते अडीच पटीने वाढते.
– विद्राव्य खतांचा वापर थेट मुळांपाशी होत असल्याने पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये खतांमध्ये 30 टक्के बचत होते.
तणांचा प्रादुर्भाव कमी होऊन आंतरमशागत खुरपणी किंवा तणनाशकांचा खर्च कमी होतो.
– विज खर्चात 35 ते 45 टक्के बचत होते.
– पाणी व खते देण्यासाठी कमी मजूर लागतात.
– एकूणच उत्पादन खर्चात 20 टक्‍क्‍यांपर्यंत बचत होते.
– ऊस उत्पादनात 30 टक्के तर साखर उताऱ्यात 0.5 युनिटने वाढ होते
– जमिनीची सुपीकता व उत्पादनक्षमता टिकून राहण्यास मदत होते.

देखभाल कशी कराल

महिन्यातून एकदा न चुकता पहिल्यांदा सबमेव व नंतर ड्रीप लाईन फ्लश कराव्यात त्यात साठलेली घाण निघून जाईल. पाणी परीक्षण अहवालानुसार आम्ल प्रक्रिया करावी. उसाच्या मुळ्या ठिबक लाईन मध्ये घुसू नयेत म्हणून तणनाशकाची प्रक्रिया शिफारसीप्रमाणे करावी.