हॅलो कृषी ऑनलाईन: खोल समुद्रातील पावसाळी मासेमारी (Deep Sea Fishing) 1 जूनपासून बंद होती. परंतु आता शासनाच्या आदेशानुसार 62 दिवसांच्या विश्रांतीनंतर 1 ऑगस्टपासून ही खोल समुद्रातील मासेमारी पुन्हा सुरु होणार आहे.
पर्शियन नेट फिशिंग (Persian Net Fishing) आणि खोल समुद्रातील मासेमारी (Deep Sea Fishing) या दोन्ही प्रकारांतील मासेमारीला दहा दिवसांचाच अवधी उरला आहे. यामुळे आपल्या बोटी वल्हविण्यासाठी करंजा-मोरा-कसारा, ससूनडॉक बंदरात आतापासूनच हजारो मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच खवळलेला समुद्र शांत होतो. नीरव शांत झालेल्या सागरात पर्ससीन नेट फिशिंगसाठी पोषक वातावरण असते. राज्यभरातील लाखो मच्छीमार (Fisherman) खोल समुद्रातील (Deep Sea Fishing) आणि पर्शियन फिशिंग (Persian Fishing) या दोन प्रकारांतील मासेमारी मोठ्या प्रमाणात करीत असतात.
किनाऱ्यापासून दूर, किमान 100 फूट खोल पाण्यात मासेमारी (Deep Sea Fishing) करणे याला खोल समुद्रातील मासेमारी म्हणतात, याला बिग गेम किंवा ऑफशोअर फिशिंग (Big Game Fishing Or Offshore Fishing) असेही म्हणतात.
समुद्राच्या पृष्ठभागावरील 4 ते 5 किमी परीघातील परिसरात 35 ते 40 वाव खोलीपर्यंत पर्ससीन नेट फिशिंग केली जाते. गोल परीघातील सर्कलमध्ये शिशाच्या गोळ्या बांधलेली जाळी समुद्रात सोडली जाते.
गोलाकार सर्कल सील केल्यानंतर समुद्राच्या पृष्ठभागावरील विविध प्रकारांतील तरंगती मासळी अलगद जाळ्यात अडकते. त्यानंतर यंत्राच्या साहाय्याने जाळी मच्छीमार बोटीत खेचतात.
- घोळ, काटबांगडे, मुशी, तकला, सुरमय, शिंगाला, तुणा, हलवा, तांब, पाखट यासारखी मासळी याठिकाणी पकडली जाते.
- मासेमारीसाठी मच्छीमारांना 50 ते 70 वाव खोल समुद्रात जावे लागते. त्यासाठी एका ट्रिपसाठी 10 ते 12 दिवस खर्ची घालावे लागतात, व सव्वा ते दीड लाखापर्यंत खर्च येतो.
- समुद्राच्या तळाशी असलेली सर्वच प्रकारची मासळी या पद्धतीत पकडली जाते.
- चांगल्या प्रतीची निर्यात करण्यायोगी मासळी (Export Fish) खोल समुद्रातील मासेमारीत मिळत असल्याने या पद्धतीच्या मच्छीमारांची संख्या सर्वाधिक आहे.
मासळीची आवकही वाढणार
दहा दिवसांत मासेमारीला सुरुवात होणार असल्याने नौकांची यांत्रिक दुरूस्ती, रंगरंगोटी, जाळी आदी तत्सम कामांसाठी हजारो मच्छीमारांची विविध बंदरात लगबग सुरू आहे. 1 ऑगस्ट पासून मच्छीमार बोटींना डिझेलचा कोटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे डिझेल भरण्यासाठी मच्छीमार बोटींची कसारा आणि ससूनडॉक बंदरात हळूहळू गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.
डिझेल, आवश्यक साधन-सामुग्री उपलब्ध होताच तात्काळ हजारो मच्छीमार बोटी 1 ऑगस्टपासून मासेमारीसाठी रवाना होणार आहेत. मासेमारीला (Deep Sea Fishing) सुरुवात होताच 10-15 दिवसांत मासळीची आवक वाढणार आहे. त्यामुळे वाढलेले भाव आटोक्यात येऊन खवय्यांनाही बाजारात विपुल प्रमाणात मासळी उपलब्ध होणार आहे.