हॅलो कृषी ऑनलाईन। नव्याने करण्यात आलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी साध्या दिल्लीत आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. केंद्र सरकार आणि ४१ शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे चर्चा झाली. ही चर्चेची आतापर्यंतची सातवी फेरी होती. या चर्चेत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर, रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तसेच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्य मंत्री सोम प्रकाश देखील सहभागी झाले होते.
चर्चेच्या सुरुवातीला आंदोलना दरम्यान दिवंगत झालेल्यांप्रती दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. याआधी झालेल्या बैठकांमधली चर्चा लक्षात घेत, शेतकऱ्यांच्या मुद्याबाबत खुल्या मनाने तोडगा काढण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे तोमर यांनी सांगितले. समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी केवळ एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत कृषी कायद्याबाबत विविध राज्यातल्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. वादग्रस्त मुद्यांच्या निराकरणासाठी, कृषी कायद्याबाबत कलम निहाय चर्चा सुरु ठेवता येईल असे ते म्हणाले. बैठकीत दोन्ही बाजूनी आपापली मते मांडली. ८ जानेवारी २०२१ ला पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.