हॅलो कृषी ऑनलाईन । दुध (Milk Production) हा एक आदर्श अन्नपदार्थ आहे. दुधामध्ये सर्व जीवनावश्यक अन्न घटक उपलब्ध असल्यामुळे त्यामध्ये सुक्ष्मजंतु व जिवाणुंचा शिरकाव व त्यांची वाढ लवकर होते. व दुध लवकर खराब होते. निरोगी व स्वच्छ जनावरांपासुन मिळणारे दुध स्वच्छ असते. पण त्यामध्ये दुषित वातावरणातुन धुळ व रोगजंतुचा प्रवेश होऊन दुध खराब होऊ शकते. भारताचा दुध उत्पादनात जगामध्ये प्रथम क्रमांक लागतो. पण उच्च गुणवत्तापुर्ण व निर्यातक्षम दुध उत्पादन करणे आवश्यक आहे. स्वच्छ दुध उत्पादन करण्यासाठी खालील बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे.
१) गोठा व्यवस्थापन-
जनावरांचा गोठा हा हवेशीर, भरपुर सूर्यप्रकाश असणारा व नेहमी कोरडा राहणारा असावा. पाणी किंवा मलमूत्र जमिनीवर साठून राहू नये. निचरा होण्यासाठी योग्य उतार व चर असावा. तीन महिन्यातून एकदा रोगजंतुनाशके फवारून घ्यावे. जनावरांचा गोठा आणि दूध काढण्याची (Milk Production) जागा शक्यतो वेगळी असावी. दूध काढण्यासाठी स्वच्छ मोकळी जागा वापरली तरी चालेल.
२) जनावरांची निगा-
जनावरांना संतुलित व पुरेसा आहार व स्वच्छ पाणी पुरवावे जेणेकरुन त्यांचे आरोग्य चांगले राहील. दुभती जनावरे वेगळी करुन त्यांचा कमरेचा भाग, मागील मांडया, शेपटी यावरुन खरारा करावा. जनावराला धारेसाठी बांधल्यानंतर कोमट पाण्यात अगदी कमी प्रमाणात पोटॅशियम परमँगनेटचे खडे टाकुन तयार केलेल्या सौम्य द्रावणाने कास व सड धुवावे व लगेच स्वच्छ कापडाने पुसावेत. कोमट पाण्याने कास धुतल्यानंतर गाय / म्हैस पान्हा सोडण्यास सुरुवात करते. धार काढल्यानंतर ३० ते ४० मिनिटे सडाची छिद्रे उघडीच असतात. त्यामुळे धार काढल्यानंतर जनावरांचे सड ३ ते ४ टक्के रोगजंतुनाशक औषधाच्या द्रावणात उदा. सेल्फॉक्स, पिव्हीपाल, डिपाल, व्हेकाडीन, साव्लान इत्यादी मध्ये बुडवावेत. यामुळे गोठ्यातील जंतुंचा सडावाटे कासेत प्रवेश होणार नाही. प्रतिजैविक दिल्यानंतर दुध ७२ तास उपयोगात आणू नये.
३) दुधासाठी वापरावयाची भांडी- Milk Production
दुध काढण्यासाठी तोंडाकडे निमुळती असणारी (डोम शेप) जास्त खाचा नसणारी भांडी वापरावीत. दुध स्वच्छ व कोरडया शक्यतो स्टीलच्या भांडयात मलमलच्या पांढऱ्या कापडातून गाळून साठवावे. दुध भांड्यात घेण्यापूर्वी भांडे स्वच्छ धुवावे व कोरडे करूनच वापरावे. व वापर झाल्यानंतर भांडे परत स्वच्छ धुवून कोरडे करून ठेवावे.
४) दुध दोहन प्रक्रिया-
दुध काढण्यासाठी (Milk Production) संपुर्ण मुठ पध्दतीचा वापर करावा, अंगठा दाबून किंवा चिमटीने दुध काढू नये दोहनाची प्रक्रिया सुमारे ७ ते ८ मिनिटात पूर्ण करावी. चुकीच्या पध्दतीमुळे स्तनाला इजा होते. शक्यतो दोहनासाठी मशिनचा वापर करावा. दुध काढताना वाळलेली वैरण, घास या प्रकाराचे खादयदेऊ नये. फक्त आंबवण दयावे. अपुर्ण दोहण टाळावे. आचळातील शिल्लक दुध जिवाणुच्या वाढीसाठी कारणीभूत ठरते. ताज्या दुधामध्ये शिळे दुध मिसळू नये. काढलेल्या दुधाचे भांडे स्वच्छ कोरडया व थंड ठिकाणी ठेवावे व लवकरात लवकर त्या दुधाचा वापर किंवा त्यांची विक्री करावी.
५) दुध काढणारी व्यक्ती-
दुध काढणारी व्यक्ती निरोगी असावी व त्याचे कपडे स्वच्छ असावेत. त्या व्यक्तीस धुम्रपान करणे किंवा इतरत्र थुंकणे आशा वाइट सवयी नसाव्यात. त्या व्यक्तीने आपले हात पोटॅशियम परमॅगनेटच्या द्रावणात धुऊन स्वच्छ करुन दुध काढण्यास सुरुवात करावी.
६) यांत्रिकीकरण-
मिल्किंग मशीनचा वापर केल्यामुळे दुध वातावरणाच्या संपर्कात न येता बंद भांड्यामध्ये गोळा होते. यामुळे दुधामध्ये धुळीचे कण अगर जंतु जात नाहीत. पण यंत्राचे दुधाच्या संपर्कात येणारे सर्व भाग नियमित पणे स्वच्छ करणे अत्यंत महत्वाचे आहे. या भागांमध्ये दुधाचा काही अंश चिटकून राहतो व दुध टिकण्याचा कालावधी कमी होतो.
७) दुधाचे परिक्षण-
जनावरांमधील कासेचा आजार टाळण्यासाठी दुधाची कॅलिफोर्निया स्तनदाह चाचणी किंवा स्ट्रिप कप चाचणी दर १५ दिवसांनी करावी. किंवा कपावर स्वच्छ काळे कापड बांधुन त्यावर दुध घेऊन पाहावे. दुधाच्या गुठळया दिसून आल्यास स्तनदाह रोगाची सुरुवात आहे असे समजावे.
प्रा. सागर सकटे ( विषय विशेषज्ञ)
प्रा. मोहन शिर्के (कार्यक्रम समन्वयक)
कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव ता. सातारा