चांगली बातमी ! माडग्याळी मेंढीला जी.आय.मानांकनासाठी हालचाली

Madgyal Sheep
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करण्याचा व्यवसाय करतात. त्यातही शेळीपालन हा अनेक गावांमध्ये आर्थिक स्थैर्य देणारा व्यवसाय ठरतो आहे. दुष्काळात देखील चांगले उत्पादन देणारी शेळीची जात म्हणजे माडग्याळ मेंढी …लवकरच या माडग्याळ मेंढीला अधिक चांगला भाव मिळून पशुपालकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. कारण राज्य शासन स्तरावर या मेंढीला जी.आय.मानांकन प्राप्त होण्यासाठी हालचाली सुरु आहेत.

येत्या राष्ट्रीय समितीच्या (बीआरसी) बैठकीत पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. तसे लेखी पत्र आमदार विक्रमसिंह सावंत यांना दिले आहे.माडग्याळी मेंढी शासन पातळीवर दुर्लक्षित आहे. जी.आय. मानांकन मिळावे, यासाठी आमदार सावंत यांनी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडे मागणी केली होती. मंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन निवेदनही दिले होते. त्याच अनुषंगाने मंत्री केदार यांनी केलेला पाठपुरावा, येणाऱ्या ‘बीआरसी’च्या बैठकीत महाराष्ट्राला सकारात्मक निर्णय मिळेल, असे लेखी आश्‍वासन दिले.

याबाबत बोलताना आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सांगितले की , जत तालुक्यातील माडग्याळी मेंढीला जी. आय. मानांकन मिळावे, यासाठी सतत पाठपुरावा केला होता. पशुसंवर्धन मंत्र्यांना भेटून यासाठी सकारात्मक पाऊल उचलावे, अशी मागणी केली. पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी येणाऱ्या राष्ट्रीय समितीत माडग्याळी मेंढीला मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

माडग्याळी मेंढीला विशेष महत्त्व

जत तालुक्यातील माडग्याळला ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याची भीषण स्थिती दर्शवणारे येथील वास्तविक चित्र सबंध महाराष्ट्राला पाहायला मिळते. दुसरीकडे, त्याच मातीत माडग्याळी मेंढीचा जन्म होतो. त्याचे महत्त्व महाराष्ट्रातील जनतेला आहेच; आता देशाच्या कानाकोपऱ्यातही माडग्याळी मेंढीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्यातील माडग्याळी मेंढ्यांची संख्या ५६ हजार २५९ आहे; विशेषतः येथे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळसह अनेक राज्यांत या मेंढीला मागणी आहे. अनेक राज्यांतून व्यापारी येथील माडग्याळ बाजारात व्यापारासाठी येतात. लाखो रुपयांची उलाढाल होते; मात्र माडग्याळी मेंढीला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्यास उत्पादनक्षमतेसह आर्थिक मूल्य वाढणार असून, मेंढपाळाच्या मुलांना प्रोत्साहन मिळेल, अशी जतकरांना अपेक्षा आहे.

माडग्याळ मेंढी


या मेंढीची शरीरवाढ चांगली आहे. मेंढीच्या कोकराचे जन्मतः वजन तीन ते पाच किलो असते. तीन महिने वयाच्या वेळचे वजन 22 किलो होते. पूर्ण वाढ झालेल्या मेंढीचे वजन 45 ते 50 किलो इतके असते. या मेंढ्याच्या अंगावर लोकर कमी असते. या मेंढीला लाखांच्या घरात किंमत मिळते.