Mulching: शेतात मल्चिंगचा वापर करणार आहात? अगोदर ही माहिती वाचा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मल्चिंगचा (Mulching) वापर फार पूर्वीपासून होत आहे. यासाठी वेगवेगळ्या वस्तू जसे भाताचा आणि गव्हाचा पेंढा, साल, कोरडे गवत, लाकूड चिप्स, कोरडी पाने, भूसा, गवत इत्यादी सेंद्रिय नैसर्गिक वस्तूंचा वापर केला जातो. तर असेंद्रिय मल्चिंग मध्ये प्लास्टिक पेपरचा वापर केला जातो. तुमच्यापैकी बहुतेक शेतकरी शेतात मल्चिंगचा वापर करत असतील.

झाडांच्या किंवा पिकांच्या चांगल्या वाढीसाठी, विकासासाठी तसेच जास्त अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी माती झाकण्याची जी क्रिया असते यालाच मल्चिंग किंवा आच्छादन (Mulching) असे म्हणतात.

मल्चिंगचे फायदे (Advantages Of Mulching)

  • मातीतील पाण्याचे थेट बाष्पीभवन रोखते
  • तणांची वाढ रोखण्यास मदत होते
  • जमिनीतील आर्द्रता तसेच पिकांच्या मुळाजवळ आर्द्रता दीर्घकाळ टिकवून ठेवते
  • वनस्पतीच्या/पिकाच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ आणि विकास करण्यास मदत करते
  • फुलांची आणि फळांची गुणवत्ता सुधारते.
  • कीड/कीटक नियंत्रण करण्यास मदत मदत होते
  • उष्णता आणि थंड रोधक म्हणून कार्य करते
  • मल्चिंगच्या वापरामुळे मातीची धूप होत नाही
  • क्षारतेची पातळी कमी करते

मल्चिंगचे प्रकार (Types Of Mulching)

साधारणपणे, मल्चिंगचे दोन मुख्य प्रकार असतात

  • जैविक/सेंद्रिय आच्छादन
  • अजैविक/प्लास्टिक आच्छादन

सेंद्रिय मल्चिंग

सेंद्रिय मल्चिंगमध्ये भाताचा पेंढा, गव्हाचा पेंढा, साल, कोरडे गवत, लाकूड चिप्स, कोरडी पाने, भूसा, गवत इत्यादी नैसर्गिक वस्तूंचा समावेश होतो.   

पेंढा मल्चिंग (Straw Mulch)- भाजीपाला आणि फळ पिकांसाठी भात आणि गव्हाचा पेंढा मल्चिंग म्हणून वापरतात. इतर आच्छादनांच्या तुलनेत पेंढ्याचे आयुष्य जास्त असते. पेंढा कुजल्यानंतर माती अधिक सुपीक बनते.

गवताचे मल्चिंग (Grass Clipping Mulch) – हिरवे गवत किंवा कोरडे गवत आच्छादनासाठी वापरले जाते. कुजल्यानंतर गवत जमिनीला नायट्रोजन पुरवते. पावसाळ्यात, हिरवे गवत तेथेच रुजते, म्हणून आच्छादनासाठी कोरडे गवत वापरावे.

पाने– पानझडी झाडांची गळून पडलेली पाने एकत्रितपणे मातीच्या आच्छादनासाठी सर्वोत्तम मल्चिंग आहे. कारण ते उत्तम उष्णता आणि थंड रोधक म्हणून कार्य करते. आणि गाजर सारख्या मूळवर्गीय पिकांसाठी हे मल्चिंग उपयुक्त आहेत.

सेंद्रिय मल्चिंगचे तोटे (Disadvantages Of Organic Mulching)

  • सेंद्रिय पालापाचोळा माती खूप ओलसर करते; त्यामुळे रूट झोन जवळील ऑक्सिजनची पातळी कमी होते.
  • अनेक सेंद्रिय प्रकारचे आच्छादन कीटक गोगलगाय आणि उंदरांना आश्रय देतात.
  • गवत आणि पेंढा पालापाचोळा मध्ये बिया असतात जे नंतर तण बनू शकतात.
  • सेंद्रिय आच्छादन सामग्री सहजपणे विघटित होते आणि वारंवार बदलण्याची आवश्यकता असते.

अजैविक मल्चिंग (Inorganic Mulching)

व्यावसायिक शेतीमध्ये अजैविक आच्छादनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सर्व अजैविक आच्छादनांमध्ये प्लॅस्टिक आच्छादन ही  सर्वात सहज उपलब्ध होते. आणि ते सहजासहजी विघटित होत नाही. या प्लास्टिक मल्चिंगचा वेगवेगळ्या रंगानुसार उपयोग होतो.

  • काळे प्लास्टिक मल्चिंग पेपर (Black Mulch)

हे आच्छादन कोणताही प्रकाश परावर्तीत करत नाही. हे ओलावा टिकवून ठेवण्यास, तण नियंत्रित करण्यास मदत करते.

  • पिवळा- तपकिरी प्लास्टिक मल्चिंग पेपर

भागात पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या भागात याचा वापर केला जातो. पिवळा रंग पांढर्‍या माशीला आकर्षित करतो म्हणून जेव्हा पांढरी माशी सूर्याच्या उष्णतेमुळे मल्चिंग पेपर च्या संपर्कात येते तेव्हा त्यांचा मृत्यू होतो.

  • चांदी- काळा प्लास्टिक मल्चिंग पेपर

हे आच्छादन जवळजवळ प्रत्येक पिकासाठी योग्य आहे. हे आच्छादन 27% प्रकाश परावर्तित करते, त्यामुळे फळे व वनस्पतींचा रंग सुधारते. असे आढळून आले आहे की याचा वापर केल्याने डाळिंब आणि स्ट्रॉबेरी फळे अधिक उठावदार रंगाची होतात.

  • पांढरा – काळा प्लास्टिक मल्चिंग पेपर

या मल्चिंग पेपर च्या वापराने पिकांची वाढ अधिक निरोगी होते. तसेच कीटकांचा व रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो, जास्त उत्पादन मिळते. उन्हाळ्यात या मल्चिंग पेपरचा वापर जास्त केला जातो.

मल्चिंग पेपर कसे निवडावे (How To Select Mulching Paper)

मल्चिंग पेपर निवडताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

मल्चिंग पेपरची जाडी – मल्चिंग पेपर जाडी पीक प्रकारावर अवलंबून असते.

भाजीपाला पिकांसाठी मल्चिंग पेपरची जाडी 15 मायक्रॉन ते 30 मायक्रॉनपर्यंत निवडावी  असते, एका वर्षापेक्षा जास्त वापरत असाल तर भाजी पिकांसाठी 30 मायक्रॉन जाडीचे मल्चिंग पेपर वापरावे ; थोड्या कालावधीसाठी याचा वापर करणार असाल तर, 25 मायक्रॉन जाडीचे मल्चिंग पेपर वापरावे.

फळ पिकांसाठी मल्चिंग पेपर जाडी 100 मायक्रॉन ते 150 मायक्रॉनपर्यंत असते. फळबागा पिकांसाठी जेथे जास्त टिकाऊपणा आवश्यक आहे, जर मातीमध्ये जास्त दगड असेल तर 150-मायक्रॉन मल्चिंग पेपर निवडा; अन्यथा, 100-मायक्रॉन मल्चिंग पेपर निवडा.

मल्चिंग पेपर चाचणी – मल्चिंग फिल्मस हे सूर्य प्रकाश रोधक असणे गरजेचे आहे. हे  तपासण्यासाठी एक लहान प्लास्टिक मल्चिंग पेपर घ्या; जर तो प्रकाश आरपार होत असेल तर, तो कधीही वापरू नका.

योग्य स्त्रोतांकडून दर्जेदार साहित्य खरेदी:

चांगले मल्चिंग पेपर एअरप्रूफ आणि थर्मल प्रूफ हे वैशिष्ट्ये असतात. भारतात, फक्त काही मल्चिंग उत्पादक कंपन्या या पॅरामीटरचे पालन करतात, म्हणून दर्जेदार  स्त्रोताकडून मल्चिंग फिल्म खरेदी करावी.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.