हॅलो कृषी ऑनलाईन : साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. मात्र अनेकदा जनावरांना सापांकडून दंश (Snake Bite) होतो. विशेषतः पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. आजच्या लेखात जनावरांमधील सर्पदंश याचीच माहिती आपण घेणार आहोत.
शेतकरी मित्रानो, भारतात ३०० च्या आसपास जाती आहेत. त्यातील ५० विषारी असल्या तरी प्रामुख्याने चार अतिविषारी साप भारतात आढळतात. सर्पदंश वर्षभर आढळतो. मात्र प्रामुख्याने पावसाळ्यात विशेषतः जुलै ते सप्टेंबर आणि पावसाळ्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अधिक आढळतो. नाग, कवड्या किंवा घोणस, फुरसे आणि मण्यार हे विषारी साप आहेत. सर्पदंश प्रामुख्याने लवकर सकाळी किंवा संध्याकाळी ६ ते ७ च्या सुमारास अधिक दिसून येतो. या वेळात साप भक्ष्य पकडण्यासाठी फिरत असतात.
विषातील घटकांचा परिणाम
सापाचे विष हे त्यांच्या लाळ ग्रंथीतून स्त्रवणारा पिवळ्या रंगाचा पातळ पदार्थ असून त्यात विकरे, खनिजद्रव्ये, प्रथिने आणि वीसहून अधिक इतर अनेक अकार्बनिक पदार्थ असतात. नाग व मण्यार या जातीच्या सापाच्या विषात न्युरोटॉक्झीन असते. हे विष चेतासंस्था म्हणजे मेंदूवर प्रभाव करून निकामी करते. कवड्या, फुरसे या घोणस जातीच्या सापाबरोबर मण्यार या जातीच्या विषात प्रामुख्याने हिमोटॉक्सीन असते. हे विष शरीरात रक्त स्त्राव घडवून आणते. सायटोटॉक्झीन हे सर्व जातीच्या विषात असते. हे विष शरीरातील सर्व पेशी निकामी करते किंवा नष्ट करते. यामुळे पेशींना सूज येते, पेशी सडतात. या व्यतिरिक्त रक्त गोठण्याच्या क्रियेवर परिणाम करणारे अनेक घटक असतात. त्यामुळे जनावरे दगावतात.
सर्पदंशाची लक्षणे
सर्वच जातीच्या सर्पदंशात (Snake Bite) चाव्याच्या ठिकाणी म्हणजे तोडांवर, पुढच्या किंवा मागच्या पायावर सर्वसामान्यपणे खालील बाजूस सुजेस सुरवात होते. ती हळूहळू वर वाढत जाते. सूज आलेल्या पायाने जनावर लंगडते. तोडांवर सजू असेल तर श्वसनास त्रास होतो. सुजेतून रक्तस्राव होतो. नाकातून लघवी, शेणातून रक्त पडते. जनावर आडवे पडून दगावते.नागदंशात जनावर थरथरते, दात खाते, पापण्याची उघडझाप बंद होते. श्वसनास त्रास होतो. तोंडातून लाळ गळणे, उलटी होते. जनावर आडवे पडून झटके देते.
सर्पदंश लक्षणावरून विषारी सापाची ओळख
घोणस सर्पदंशामध्ये सूज वेगाने मोठ्या प्रमाणावर येते. रक्तस्राव अधिक प्रमाणात होतो. उपचारास विलंब झाला तर कोरडा गँगरीन हळूवार होतो. चेतासंस्थेशी निगडित लक्षणे फारशी दिसत नाहीत. मण्यार दंशामध्ये सूज कमी दिसते. लक्षणास थोडा विलंब होतो. शरीर अंतर्गत रक्तस्राव झाल्याने पोटदुखी आणि झटके ही प्रमुख लक्षणे दिसतात.
विषारी व बिनविषारी सर्पदंशाची ओळख
विषारी सर्पदंशामध्ये दोन खोल दाताच्या जखमा दिसतात. बिनविषारी सर्पदंशात इंग्रजी यू आकाराच्या बारीक खरचटल्या सारख्या जखमा दिसतात. विषारी सर्पदंशात चाव्याच्या जागेवर वेदना अधिक असतात. लक्षणांची तीव्रता अधिक असते. खाणे पिणे बंद होते, सुस्तपणा येतो. रक्तस्राव दिसतो.
सर्पदंश झाल्यावर तातडीचा उपचार
जनावरास पूर्ण आराम द्यावा. त्यांची हालचाल टाळावी.सर्पदंश झालेल्या दोन इंच वरच्या बाजूस पट्टीने बांधावे. दर वीस मिनिटांनी अर्ध्या मिनिटासाठी पट्टी सोडावी.
सर्पदंश झाल्यावर काय करू नये?
१) जनावरास चालवत, पळवत दवाखान्यात नेऊ नये. ज्यामुळे विष लवकर पसरते. जनावरास पूर्ण आराम द्यावा
२) सुजेवर घासून पुसू नये, त्यामुळे विष पसरते.
३) जखमेवर डाग देणे, कोंबड्याचे गुदद्वार लावणे, जखम करणे, चिरा देणे, जखमेवर शेंदूर लावणे, जागेवर तोंड लावून विष बाहेर काढणे असे अघोरी प्रकार करू नयेत.
सर्पदंशात रक्त तपासणीचा उपयोग ः
सर्पदंशाची तीव्रता ही प्लेटलेट्सची संख्येवरून तसेच रक्त गोठण्याच्या क्रियेवरून ओळखता येते. प्लेटलेट्सची संख्या जेवढी कमी व रक्त गोठण्यास जेवढा विलंब तेवढी तीव्रता अधिक असते. मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित चालू आहे का हे पण कळते.
सर्पदंशावर प्राण्यासाठी उपचार पद्धती ः
उपचार पद्धती ही मनुष्यासारखी आहे. यामध्ये मुख्यत्वे अँटी व्हेनम वापरले जाते. फरक एवढा आहे मोठ्या जनावरांना मात्रा कमी लागते. यशस्वितेसाठी लवकर उपचार करणे आवश्यक आहे.
सर्पदंश टाळण्यासाठी उपाययोजना
जनावरांना सुरक्षित निवारा द्यावा. गोठा, परिसरात अडगळ नसावी. स्वच्छता ठेवावी. जनावरांना दाट (Snake Bite) कुरणात चरावयास शक्यतो टाळावे. जनावरांना अंधारात चरावयास सोडू नये. जनावरांचे शक्यतो गोठ्यामध्ये संगोपन करावे.