हॅलो कृषी । थायलंड म्हटलं कि आपल्या डोळ्यापुढे येतो तो बॅंकॉक आणि इतर मोठ्या शहराचा झगमगाट! थाई स्वागत आणि मसाज सुद्धा. पण, थायलंड आशियातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे हे फार कमी लोकांना माहिती असेल. तेव्हा आपण थायलंड मधील दुधाच्या क्रांती विषयी जाणून घेणार आहोत. १९६० च्या दशकात थायलंड दूध व्यवसायाकडे वळला. थायलंडने दूध आणि उत्पादनाच्या निर्यातीमध्ये चांगलाच जम आत्ताच्या घडीला बसवला आहे. थायलंड दुधाची निर्यात मोठ्या प्रमाणात करत असला तरी त्याचा देशांतर्गत दूध वापर अत्यंत कमी आहे. देशांतर्गत दुधाचा वापर वाढविण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने दुधाचे उत्पादन आणि दुधाचे पदार्थ बनवण्यास प्रोत्साहन देण्यास सुरवात केली आहे.
थायलंड मध्ये दुधाचा इतिहास पहिला तर असे दिसते कि १७ जानेवारी १९६२ ला पहिला थाई-डॅनिश डेअरी फार्म उभा राहिला होता. हाच दिवस थायलंडचा ‘राष्ट्रीय दूध दिवस’ म्हणून साजरा केला जातो. पुढे १९७१ मध्ये हा फार्म शासनाच्या शेती खात्याकडे सुपूर्द केला गेला आणि ‘दुग्ध प्रसार संस्था’ म्हणून नावारूपाला आला. या संस्थेत शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादनाचं प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं. या प्रशिक्षणामध्ये जनावरांची काळजी, त्यावरील कीड-रोगनिवारण, पशुखाद्य, थायलंडच्या वातावरणात टिकू शकतील अशा गाईंच्या जाती विकसित करणं, दुधावर प्रक्रिया करून वेगवेगळे पदार्थ बनवणं आणि मांसाहारी थाई माणसाला दुधाची गोडी लावणं यांसारख्या विषयात ही संस्था काम करू लागली. यामुळे खऱ्या अर्थाने दुधाची क्रांती होण्याची इथूनच सुरुवात झाली.
थाईलँडमध्ये सुद्धा सहकार तत्व चांगले रुजले आहे. ‘दूध सहकारी संस्था’ थायलंडमध्येही आहेत. सहकारी संस्थांचं लोण इथं १९७१ मध्येच पसरायला सुरुवात झाली होती. पण लोकांचा दूध पिण्याकडे जास्त कल नव्हताच. मग १९८५ मध्ये थाई सरकारने ‘पियो ग्लासफूल दूध’ असं म्हणत ‘राष्ट्रीय दूध पिणे मोहीम’ सुरू केली. दूध पिण्याचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला. थाई माणूस दरवर्षी दरडोई फक्त १८ लिटर दूध पितो. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार एका माणसाने वर्षाकाठी कमीत कमी २५ लिटर दूध प्यायले पाहिजे. भारतात लोक तुलनेने जास्त जागरूक असून, दरडोई सरासरी ४८.५ लिटर दूध वर्षाकाठी रिचवतात. भारतातून गाई-म्हशी घेऊन दूध व्यवसाय सुरू करणाऱ्या थायलंडने मोठी बाजी मारलीय. चीनला मागे टाकत तो आशिया खंडात सर्वांत मोठा दूध निर्यातदार देश बनलाय. २०१५ मध्ये ३.३१ कोटी डॉलर्सची निर्यात करून २.४२ कोटी डॉलरवाल्या चीनला मागे टाकलं आणि अव्वल नंबर पटकावला.
भारत जगात सर्वांत मोठा दूध उत्पादक देश आहे. अख्ख्या जगातलं १८ टक्के दुधाचं उत्पादन आपण करतो. पण दूध निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या पंधरा देशांमध्ये देखील आपला नंबर लागत नाही. याला एक कारण आपण देशात दुधाचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. आहारात मुख्य पदार्थ म्हणून दूध वापरले जाते. पण निर्यातीसाठी आवश्यक गुणवत्ता निकषात आपलं दूध नापास ठरतं. त्यामुळे भारतातूनही दुधाच्या उत्पादनावर आणि निर्यातीवर विशष लक्ष केंद्रित केल्यास भारतातूनही निर्यात मोठ्या प्रमाणात करू शकतो याबद्दल शंका नाही.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा