हॅलो कृषी ऑनलाईन : पूर्व विदर्भात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जमिनीच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. त्यामुळे विदर्भांतील शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात काही हाती येणार की नाही असे वाटत असताना माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी या भागात खरीप हंगाम 90 टक्के संपल्यात जमा असल्याचा दावा केला आहे. सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्या एका विशेष समितीने नागपूर जिल्ह्यात शेतीच्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. दोन दिवस चाललेल्या या दौऱ्यानंतर केदार यांनी नागपूर जिल्ह्यात खरीप हंगामाची 90 टक्के पिकं अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याचा किंवा नष्ट झाल्याचा दावा केला आहे.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, अतिवृष्टीमुळे झाडावरील मोसंबी किंवा संत्री एक तर गळाली आहे किंवा गळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे यावर्षी मृग बहाराची संत्री किंवा मोसंबी खायला मिळणार नाही असे केदार म्हणाले. फक्त कापूस किंवा सोयाबीन हे विदर्भातील पारंपरिक पीकच नाही. तर नागपूर जिल्ह्यात विशेषत्वाने घेण्यात येणाऱ्या संत्रा आणि मोसंबीच्या बागांनाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्याचा दावा केदार यांनी केला आहे.
काय आहे काँग्रेस पाहणी समितीचे म्हणणे ?
–नागपूर शहराच्या अवतीभवती होणारी भाजीपाल्याची शेती ही पूर्णपणे नष्ट झाल्याचे काँग्रेसच्या पाहणी समितीने म्हटले आहे.
–राज्यात नव्याने आलेल्या सरकारने खुल्या हाताने शेतकऱ्यांना मदत करावी.
–यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आलेल्या महापुराच्या काळात एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे निकष बदलून ज्या पद्धतीने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना मदत केली होती. त्याच धर्तीवर विद्यमान शिंदे- फडणवीस सरकारने मदत करावी अशी मागणी ही सुनील केदार यांनी केली आहे.