हॅलो कृषी ऑनलाईन : सद्य परिस्थितीमध्ये मराठवाड्यातील बऱ्याच भागात विशेषता: उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यातील सोयाबीनवर पिवळा मोझॅक (Soybean Mosaic) (केवडा) या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. हा रोग विषाणूमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही याची पर्यायी यजमान वनस्पती आहेत. या रोगामुळे सोयाबीनमध्ये 15 ते 75 टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. आजच्या लेखात सोयाबीनवर हा रोग झाल्यास कसे व्यवस्थापन करायचे याची माहिती घेऊया…
रोगाची लक्षणे :
सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरीपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे (Soybean Mosaic) अथवा अनियमित पट्टे दिसतात त्यानंतर पाने जसे जसे परिपक्व होत जातात तसे तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. तसेच दाण्यामधील तेलाचे प्रमाण घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते. हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशी द्वारे केला जातो.
सोयाबीनवरील पांढरी माशी आणि पिवळा मोझॅक विषाणूचे एकात्मिक व्यवस्थापन
- पिवळा मोझॅक झालेली प्रादुर्भावग्रस्त पाने, झाडे वेळोवेळी काढून नष्ट करावीत जेणेकरून (Soybean Mosaic) निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल.
- वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे.
- रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून थायमिथोक्झाम 25 टक्के हे कीटकनाशक 40 ग्रॅम प्रति एकरी फवारावे.
- पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकरी 10 पिवळे चिकट सापळे लावावेत.
- फवारणीसाठी कीटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी.
- नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा.
- मूग, उडीद यासारख्या पर्यायी खाद्य वनस्पतीवरून पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी अशा पिकावरील पांढरी माशीचे व्यवस्थापन करावे.
- कमीत कमी पहिले 45 दिवस पीक तणमुक्त ठेवावे.
- पावसाचा ताण पडल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे.
- बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडतो आणि पुढील हंगामात पर्यायाने किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो.
पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर दुसरी फवारणी करावी.
अधिक माहितीसाठी संपर्क करा
डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत आणि श्री.एम.बी.मांडगे
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी
☎ ०२४५२-२२९०००