पूर्ण ‘एफआरपी’ शिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही : राजू शेट्टी

Raju Shetti
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : या हंगामात एफआरपीची पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. इस्लामपूर येथे बुधवारी (ता. ७) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना शेट्टी म्हणाले, साखर कारखान्यांनी गेल्या वेळी दिलेली एफआरपी तुकड्याने दिली. ती पंधरा टक्के व्याजासकट दिली पाहिजे, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. कारखान्यांनी तो पाळावा. कारखान्यांना चांगला दर मिळाला आहे. त्यांनी यंदा एफआरपीपेक्षा अजून २०० रुपये जादा द्यावेत आणि तेही हंगाम सुरू होण्यापूर्वी द्यावेत, अशी स्वाभामिनीची आग्रही भूमिका आहे. या हंगामात एफआरपीची पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही

ते पुढे म्हणले , ‘‘केंद्र शासनाने निर्यात साखरेला चांगला भाव दिला आहे. कारखान्यांना चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे २०० रुपये वाढवून द्यावेत. कारखाने बिगर सभासदांकडून घेत असलेले पैसे बेकायदेशीर आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या ठेवींची मागणी करावी,’’ असे आवाहन शेट्टी यांनी केले.

‘‘साखर कारखान्यांद्वारे होणारी काटामारी गंभीर आहे. जवळपास एका खेपामागे दोन ते अडीच टन उसाची काटामारी होते. वर्षाला सरासरी ७० हजार टन केवळ काटामारीतून मिळतात. ही साखर काळ्या बाजारात विकली जाते. यातून एकट्या राज्याचा विचार केला तर २०० कोटींच्या वर जीएसटी सरकारचा बुडतो. शासनाने कारखान्यांच्या गोडाउनवर छापे टाकावेत म्हणजे बेहिशेबी साखर किती आहे, ते कळेल,’’ असेही शेट्टी म्हणाले.