धक्कादायक! शेतकऱ्याकडून ५० हजार रुपयांच्या बदल्यात सव्वा तीन लाखांची वसुली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | शेतकऱ्यास ५० हजार रुपये कर्ज दिल्याच्या मोबदल्यात ३ लाख ३५ हजार रुपये वसूल करुन आणखी व्याजाचे पैसे देण्यासाठी घरात घसून शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना कवलापूर (ता. मिरज) येथे घडली. याप्रकरणी सर्जेराव शंकर पाटील (वय ३५, रसुलवाडी, धुळगाव) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार विजय रामकृष्ण पाटील (वय ४३), धनाजी निवृत्ती पाटील (वय ३८, दोघे रा. कवलापूर) यांच्यावर महाराष्ट्र सावकारी अधिनियम नुसार गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी सर्जेराव पाटील हे रसुलवाडी येथे राहतात. ते शेती करतात. शेती कामासाठी त्यांना बैल घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी विजय पाटील, धनाजी पाटील या दोघांकडून ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२० दरम्यानच्या काळात सर्जेराव यांनी ५० हजार रुपये कर्जाच्या मोबदल्यात तब्बल ३ लाख ३५ हजार रुपयांची परतफेड केली. तरीही संशयित विजय पाटील आणि धनाजी पाटील या दोघांनी त्यांना व्याजाच्या पैशासाठी तगादा लावला. व्याजाचे पैसे देण्यासाठी ते सर्जेराव यांना व त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देत होते. पैशाची परतफेड करुनही पुन्हा पैशांची मागणी केली जात असल्याने सर्जेराव कंटाळले होते.

सर्जेराव पैसे देत नसल्याने संशयितांनी त्यांच्या घरात घुसून त्यांनी शिवीगाळ केली. त्यांना मारहाण करुन धमकी दिली. तसेच सर्जेराव यांच्या खिशातील १२ हजार ५०० रुपयांची रोकड जबरीने काढून घेतली. या सर्व प्रकारामुळे सर्जेराव पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार पोलिसांनी विजय पाटील आणि धनाजी पाटील या दोघांवर महाराष्ट्र सावकरी अधिनियमनुसार गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे. अटकेनंतर दोघांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दंडिले करीत आहेत.