Agriculture News : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Dhananjay Munde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture News : दिवेआगार (ता. श्रीवर्धन, जि. रायगड) येथील सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता देऊन यासाठी 5 कोटी 64 लाख 31 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. मंत्रालयात आज दिवेआगार ता.श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्र, गिरणे, ता.तळा येथे खार भूमी संशोधन केंद्र आणि किल्ला, ता.रोहा येथील काढणी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन करुन बी.टेक (फूड टेक्नॉलॉजी) महाविद्यालय सुरु करण्याबाबतची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी मंत्री श्री.मुंडे बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी विद्यापीठाचे अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.मुंडे म्हणाले की, दिवेआगार येथे 5 एकर जागेत सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास त्वरीत मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पाच कोटी 64 लाख 31 हजार रुपयांची निधीची तरतूद करण्यात आली आहे. किल्ला, ता.रोहा येथील काढणीपश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन करुन बी.टेक (फूड टेक्नॉलॉजी) महाविद्यालय सुरु करण्याबाबतचा आराखडा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी सादर करावा. तसेच विद्यापीठाला गिरणे, ता. तळा येथे दिलेल्या जागेत उभारण्याच्या खारभूमी संशोधन केंद्राचा आराखडा तयार करुन मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देशही मंत्री श्री.मुंडे यांनी यावेळी दिले.

हे आराखडे तयार करताना कोकणातील नारळ, सुपारी, आंबा या फळपिकांसोबतच विविध प्रकारच्या मसाला पिकांचाही संशोधनात समावेश करावा, तसेच श्रीवर्धन रोठा सुपारीला जीआय मानांकन मिळविण्यासाठी कार्यवाहीला गती देण्यात यावी, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी केल्या.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.