Palm Oil Import : आयातदारांकडून पाम तेलाच्या आयातीत घट करण्याचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जागतिक बाजारात निर्यातदार देशांमध्ये पाम तेलाच्या निर्यात खर्चासह किमतींमध्ये वाढ झाली आहे. परिणामी भारतीय आयातदारांनी (Palm Oil Import) डिसेंबर आणि जानेवारी महिन्यासाठी पाम तेलाच्या आयातीत (Palm Oil Import) घट करणे सुरु केले आहे. देशातंर्गत तेल रिफायनरी व्यवसायात मंदी सुरु असल्याने, त्यामुळे आता हा निर्णय या व्यवसायाला आधार देणारा ठरणार आहे.

मागील काही महिन्यांपासून देशात पाम तेलाच्या आयातीत मोठी वाढ नोंदवली गेली होती. सध्या देशात पाम तेलाचा मोठा साठा उपलब्ध आहे. परिणामी याचा देशातंर्गत खाद्यतेल निर्मिती व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून, अप्रत्यक्षरित्या त्याचा शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि अन्य तेलबिया पिकांवर परिणाम होत असतो. त्यामुळे आयातदारांनी पाम तेलाच्या आयातीत घट करण्याचा निर्णय स्वागतार्ह म्हणावा लागेल. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पाम तेल गोठत असल्याने त्याची आयात या काळात आयातदारांकडून थांबवली जाते. असे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

खर्च उच्चांकी पातळीवर (Palm Oil Import In India)

इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमध्ये क्रूड पाम तेलाचे वायदा मूल्य हे मागील दोन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या देशांच्या बंदरांवर सध्या एका शिपमेंटसाठी जवळपास 77,500 रुपये खर्च येत आहे. विशेष म्हणजे यात आयात शुल्काचा समावेश नाही. त्यामुळे एकत्रित खर्च अधिक होत असल्याने आयातदारांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारत हा जगातील प्रमुख खाद्यतेल आयातदार देश आहे. देशातील एकूण मागणीपैकी जवळपास 61 टक्के तेलाची आयात ही बाहेरील देशांकडून केली जाते. त्यामुळे या देशांना येत्या काळात वायदा मूल्यात घट करणे अनिवार्य ठरणार आहे.

7.70 लाख टनांपर्यंत आयात घटणार

भारतीय बंदरांवर आयातदारांना आपला उपलब्ध असलेला पाम तेलाचा साठा कमी भावात विक्री करावा लागत आहे. त्यानंतरच नवीन पाम तेलाची आयात करण्याचा निर्णय आयातदारांकडून घेतला जाऊ शकतो. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात पाम तेलाच्या आयातीत घट होऊन, ती 7.70 लाख टनांपर्यंत खाली येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Gorakshnath Thakare
सकाळ, ABP माझा, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. शेती क्षेत्रात विशेष रस असून शेतमाल प्रक्रिया उद्योग, बाजारभाव, वायदेबाजार, तंत्रज्ञान आदी विषयांची आवड आहे.