हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील वातावरण सतत बदलत आहे. काही भागांमध्ये थंडी आहे तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडतो आहे. राज्याच्या बऱ्याच भागामध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. सध्या उत्तर मध्य महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वादळसदृष्य परिस्थिती निर्माण झालीय. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये यामुळे गारपीट झाली असून आजही पाऊस आणि गारपीट सुरु राहील असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई, मुंबई-उपनगरे, पुणे, नाशिक, जालनासहीत मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे.
पावसामुळे शहर भागात गारवा पसरला. या पावसामुळे ज्वारी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विदर्भातही अवकाळीने हजेरी लावली सुरू आहे. बुलढाण्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात तर काही भागात गारपीट झाली आहे. गारपीटीमुळे गहू, हरभरा या पिकांना फटका बसला आहे. कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन गारवा घटतो आहे. सोलापूर जिल्ह्यासह पंढरपुरात सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस सुरूच आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस झाला आहे. उत्तर रायगडमध्येही अवकाळीने पाऊस झाला आहे. सुधागडसह कर्जत, खालापूर, पनवेलमध्ये गारांसह जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झालाय. दक्षिण रायगडसोबत उत्तर रायगडमध्येही अवकाळी पाऊस झाला आहे. माथेरानमध्येही विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला आहे. पावसाने कडधान्य पिकासह आंब्याचेही नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाला आहे. ज्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भुदरगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. गारपीटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यात पीके भुईसपाट झाली आहेत. तर गारपिटीमुळे अमरावती जिल्ह्यात मेळघाटातल्या खंडूखेडा या गावाला अक्षरशः काश्मीरचं स्वरूप आले होते. परिसरात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे. मेळघाटात सर्वदूर पाऊस कोसळत असतांना खंडूखेडा गावात प्रचंड गारपीट झाली. पाऊस आणि गारपिटीमुळे गहू, हरभरा या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांत जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस झाला. भीमाशंकर परिसरात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.