#Fact Check पीक चांगले येण्यासाठी पिकांवर फवारली देशी दारू… मात्र हा देशी जुगाड कितपत योग्य? पहा काय सांगतायत तज्ज्ञ

daru favarani
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गजाननज घुंबरे / प्रेरणा परब-खोत : हॅलो कृषी ऑनलाईन

सतत बदलते हवामान, कोरोनाचे सावट यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अशातच भाजीपाला आणि शेत पिकांवर सतत पडणारी कीड यामुळे देखील शेतकरी त्रस्त झाला आहे. अशा सर्व घटकांत पिके वाचवण्यासाठी शेतकरी महागड्या औषधाची फवारणी करतात. अनेक शेतकरी कांदा पिकावर देशी दारूची फवारणी करतात. अनेकदा मिरची पिकावर दारूची फवारणी केल्याचे तुम्ही ऐकले असेल. इतकेच नव्हे तर एका मराठी चित्रपटात देखील पिकावर दारू फवारल्याने कोमेजलेले पीक पुन्हा टवटवीत झाल्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे. मात्र लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मिरची, मेथी या भाजीपाला पिकाला वाचवण्यासाठी देशी दारूची फवारणी शेतामध्ये केली.इतकेच नाही तर 10 गुंठे शेतीत मिरची पिकावर त्यांनी हा प्रयोग करून पहिला आहे. त्यामुळे मिरची हिरवीगार दिसत असून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे. पण खरंच हा देशी जुगाड काम करतो का ? जाणून घेऊया याच्याबद्दल फॅक्ट चेक…

काय सांगतात तज्ञ ?

हॅलो कृषीच्या टीमने याबाबत तज्ज्ञांशी संपर्क साधला असता डॉ. अनिल ओळंबे शास्त्रज्ञ (उद्यानविद्या) कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर जि. हिंगोली यांनी सांगितले की, पिकांच्यावर देशी दारूच्या फवारणी बाबत शास्त्रीय दृष्ट्या कोणताही आधार नाही. पिकांच्या वाढीसाठी किंवा फळांचा आकार वाढावा याकरिता शास्त्रीय दृष्ट्या शिफारस केली जात नाही. पुढे ते म्हणाले अनेक शेतकरी पिकांच्या वाढीकरिता जीब्रालिक ऍसिड सारख्या द्रावणात फवारणीसाठी देशी दारूचा वापर केला जातो. तसेच शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या व्हायरल मेसेजेसवर विश्वास न ठेवता तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा असे म्हंटले आहे.

याबाबत बोलताना कृषी विज्ञान केंद्र लातूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस एस डिग्रजे म्हणाले, ‘पिकांवर दारूची फवारणी हे मुख्यतः शेतकरी मिरची पिकासाठी केल्याचे पाहण्यात आहे. मिरचीच्या फुलं आणि फळं येण्याच्या अवस्थेत हे वापरल्यानंतर शेतकऱ्यांना फायदा झाल्याचे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. मात्र याला शास्त्रीय दृष्ट्या कोणताही आधार नाही. शास्त्रीय द्दृष्ट्या यावर संशोधन झाले नाही. तसेच कृषी विज्ञान केंद्राने ही सांगितले नाही. मात्र अनेक किडींवर फवारल्या जाणाऱ्या औषधांमध्ये अल्कोहोलचे प्रमाण काही अंशी असते त्यामुळे त्याचा परिणाम दिसण्याची शक्यता असते. मात्र केवळ १ टक्का शेतकरी असा प्रयोग करताना दिसून येतात’ .

जिब्रेलिक ऍसिडचे द्रावण तयार करण्यासाठी दारूचा वापर

जिब्रेलिक ऍसिड हे पीक फळ अवस्थेमध्ये आल्यानंतर त्या फळाची चांगली वाढ होण्यासाठी बहुतांश वेळा शेतकरी वापरत असल्याचे पाहायला मिळते .बाजारामध्ये कृषी दुकानांवर ते विक्रीसाठी उपलब्ध असते. पावडर स्वरूपात असल्याने व ते पाण्यामध्ये सरळ विरघळत नसल्याकारणाने त्याला देशी दारू मध्ये टाकून त्याचे द्रावण केले जाते. साधारणता पाच ग्राम पॅक मध्ये हे जिब्रेलिक एसिड बाजारात उपलब्ध असते .ते शंभर मिली देशी दारू मध्ये टाकले असता 1 एकर ला पुरेल एवढे द्रावण त्यापासून मिळते .साधारणतः दहा फवारणी पंपाद्वारे हे औषध फळ अवस्थेत असणाऱ्या पिकांवर फवारली जाते .टरबूज ,खरबूज आणि कापूस पीक बोंड अवस्थेत असताना जिब्रेलिक ऍसिडचा वापर केला जातो.

काय आहेत शेतकऱ्यांचे अनुभव ?

पिकांना देशी दारू फवारणी संदर्भात आम्ही परभणी जिल्ह्यातील तीन बागायतदार शेतकऱ्यांना विचारणा केली. मिरची पिकावर शेजारील बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात येणार्‍या आनंदगाव या गावातील शेतकऱ्याने अशाप्रकारे फवारण्या करत मिरची पीक बहरात आणल्याचे त्यांनी ऐकले होते .कोकडा रोगावर हा स्वस्त आणि जालीम उपाय असल्याचे त्या शेतकऱ्याकडून ऐकल्यानंतर त्यांनी मिरची पिकावर देशी दारू फवारणीचा निर्णय घेतला होता .त्यानंतर मात्र त्यांनी अशी फवारणी केलेली नाही .

शेतातील पिकांवर देशी दारू फवारणीचा अनुभव आहे का ? असे आम्ही परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात बागायती शेती करणारे धानोरा काळे येथील प्रताप काळे यांना प्रश्न विचारला असता ,त्यांनी असा प्रयोग केला नसल्याचे सांगितले परंतु फळांचा आकार वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ जिब्रेलिक एसिड’ पाण्याऐवजी अल्कोहोलमध्ये विरघळत असल्याने आम्ही देशी दारूचा द्रावण तयार करण्यासाठी वापर केल्याचे त्यांनी मात्र मान्य केले .पुढे बोलताना ते म्हणाले की अशाप्रकारे देशी दारू फवारून एखादे पीक आले असते तर शेतकऱ्यांनी ती नियमित वापरले असते शिवाय शास्त्रज्ञांनी यावर संशोधन करत त्याची शिफारसही केली असती.मला हे सर्व मान्य होत नाही की देशी दारू फवारून एखादे पीक कीटक मुक्त किंवा जोमदार येते. असंही प्रताप काळे म्हणाले

शेवटी पाथरी तालुक्यातील कान्सुर येथील शेतकरी पांडुरंग शिंदे यांनी ते घेत असलेल्या खरबूज पिकामध्ये फळांची जाडी वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिब्रेलिक एसिड सारख्या घटकाला विरघळवण्यासाठी देशी दारूचा वापर करत असल्याचे मान्य केले. परंतु त्यांनीही पिकावर कधी फवारणी केली नसल्याचे सांगितले .त्यांच्या मते बहुतांश मिरची पीक घेणारे शेतकरी अशा प्रकारचा प्रयोग करत असल्याचे त्यांचे ऐकण्यात आहे .