हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कारांची (Padma Shri Award) घोषणा केली. यावेळी सरकारने अनेक शेतकऱ्यांना पद्मश्रीसाठी निवडले. मात्र या सर्वांमध्ये 67 वर्षीय ‘कामाची चेल्लाम्मल’ या इयत्ता सहावीपर्यंत शिक्षण झालेल्या महिला शेतकऱ्याची सर्वाधिक चर्चा होत आहे. दक्षिण अंदमानातील रंगाचांग येथे राहणाऱ्या महिला शेतकरी कामाची यांनी जैविक पद्धतीने नारळ शेती उभारली आहे. त्यांच्या याच कार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार (Padma Shri Award) घोषित झाला आहे. कामाची यांना सर्व लोक ‘नारळ अम्मा’ या नावाने ओळखतात.
महिला शेतकरी कामाची चेल्लाम्मल (Padma Shri Award) या नारळ शेती व्यतिरिक्त लवंग, आले, अननस आणि केळीची शेती देखील शेती करतात. विशेष म्हणजे कामाची या फक्त इयत्ता सहावीपर्यंत शाळेत गेल्या आहेत. मात्र त्यांची शेती करण्याची पद्धत बघून, जवळपास 150 हुन अधिक शेतकऱ्यांनी त्यांचे अनुकरण केले आहे. त्यांनी शेतीसोबतच नारळ, ताड या पिकांवरील रोगांवर उपाययोजना करण्यासाठी पद्धती विकसित केल्या आहेत. त्या आपल्या दोन हेक्टर नारळ बागेतून दरवर्षी 27,000 हुन अधिक नारळ उत्पादित करतात. त्यांच्या बागेमध्ये नारळाच्या लंबा प्रजातीचे 460 झाडे आहेत.
‘ही’ आहेत अन्य शेतकऱ्यांची नावे (Padma Shri Award For Farmers)
याशिवाय आसामच्या सरबेश्वर बसुमतारी, केरळचे सत्यनारायण बेलेरी, अरुणाचल प्रदेशचे यानुंग जामोह लेगो आणि गोव्याचे संजय अनंत पाटिल या शेतकऱ्यांना देखील पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. अरुणाचल प्रदेशच्या महिला शेतकरी ‘यानुंग जामोह लेगो’ यांना पूर्व भारतात ‘औषधी वनस्पतींची राणी’ म्हणून ओळखले जाते. सरकारी आकडेवारीनुसार, त्यांनी आतापर्यंत 10,000 हजाराहून अधिक नागरिकांना औषधी पद्धतीचा वापर करून रोगांचे निदान केले आहे. याशिवाय 1 लाखाहून अधिक नागरिकांचे औषधी वनस्पतींबाबत प्रबोधन केले आहे.
मिश्र शेतीचा यशस्वी प्रयोग
तर आसामचे आदिवासी शेतकरी बासुमतारी चिरांग यांना देखील पदमश्री पुरस्कार घोषित झाला आहे. त्यांनी मिश्र शेती यशस्वी करून दाखवल्याने त्यांची निवड पुरस्कारासाठी झाली आहे. त्यांनी नारळ, संत्री, धान, लिची आणि मका यांसारख्या विविध पिकांची एकत्रित लागवड यशस्वी करून दाखवली आहे. तर केरळचे शेतकरी सत्यनारायण बेलेरी यांची तांदळाच्या पारंपरिक 650 प्रजातींचे संवर्धन केल्याने निवड झाली आहे. त्यांची ‘राजकायम’ ही प्रजाती कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये स्वीकारण्यात आली आहे. त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून पदमश्री पुरस्कार घोषित झाला आहे.