Poultry Manure: शेतीसाठी उत्कृष्ट कोंबडी खत; जाणून घ्या फायदे आणि वापर पद्धती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: जमिनीची कमी होत जाणारी सुपीकता (Poultry Manure) आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण यामुळे जास्तीत जास्त शेतकरी शेतात सेंद्रिय खतांचा (Organic Manure) वापर करण्याकडे भर देत आहेत. सेंद्रिय खताचे वेगवेगळे प्रकार शेतकर्‍यांना माहित आहेत. त्यामध्ये कोंबडी खत हा एक सहज उपलब्ध होणारा आणि चांगला पर्याय आहे. कोंबड्यांची विष्ठा, कोंबड्यांच्या लिटरसाठी वापरलेला लाकडाचा भुस्सा, साळीचा भुस्सा, शेंगाची टरफले इ. सर्व घटक कुजल्यानंतर तयार झालेला पदार्थ म्हणजे ‘कोंबडी खत’ (Poultry Manure).

कोंबडी खताचे फायदे (Poultry Manure)

  • कोंबडी खत वापरल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते.
  • बागायती पिके जसे ऊस, फळपिके आणि फुलझाडे कोंबडी खतास चांगला प्रतिसाद देतात.
  • कोंबडी खतामध्ये मुख्यत: 13 अन्नद्रव्ये (Nutrients) असतात. त्यात नत्र व स्फुरद जास्त प्रमाणात असते. कोंबडी खतातील नत्र हे अमोनिया, नायट्रेट, युरिक ॲसिड या प्रकारांत आढळते
  • मुख्य अन्नद्रव्यांव्यतिरिक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सल्फर, सोडिअम, फेरस, मंगल, मॉलिब्डेनम, बोरॉन, झिंक, कॉपर इत्यादी अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
  • शेणखतासारखा कोंबडी खतामुळे तणांचा (Weed) प्रादुर्भाव होत नाही.

कोंबडी खताचा शेतात वापर (Application Of Poultry Manure)

  • मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर कोंबडी खत जमिनीत मिसळावे. यानंतर कुळवाची पाळी द्यावी; मात्र ताजे कोंबडीखत उभ्या पिकांत जमिनीत मिसळू नये.
  • उभ्या पिकांत कोंबडीखत जमिनीत मिसळण्यापूर्वी प्रथम त्यावर एक महिना पाणी मारून रापून किंवा थंड होऊ द्यावे म्हणजे कोंबडी खताचे कर्ब : नत्र (C:N Ratio) गुणोत्तर कमी होऊन त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.
  • कोंबड्यांच्या शेडमध्ये कोंबड्यांची विष्ठा, मूत्र, गव्हांडा किंवा भाताच्या तुसावर पडून खत तयार होते, त्यामुळे ताज्या कोंबडी खताचे कर्ब : नत्र गुणोत्तर जास्त असते. असे खत उभ्या पिकांत जमिनीत मिसळताना ओलावा असणे गरजेचे आहे.
  • जमिनीत पुरेसा ओलावा नसेल तर पीक पिवळे पडते, त्यामुळे ताजे कोंबडीखत थेट पिकांसाठी वापरू नये. उभ्या पिकांत पूर्ण कुजलेले कोंबडीखत वापरावे.

कोंबडी खत कसे असावे? (Poultry Manure Characteristics)

  • खताचा रंग भुरकट, तपकिरी, काळपट असावा. वास मातकट असावा
  • खताचा सामू 6.5- 7.5 दरम्यान असावा.
  • कोंबडी खताच्या कणांचा आकार 5 ते 10 मिमी असावा.
  • कर्ब नत्र गुणोत्तर 1:10 ते 1:20 दरम्यान असावे.
  • कोंबडी खताची जलधारणाशक्ती 30 टक्क्यांपेक्षा जास्त असावी.
Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.