Tur Intercropping: भात खाचराच्या बांधावर तुरीचे आंतरपीक देईल अधिक नफा! जाणून घ्या संपूर्ण व्यवस्थापन..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: कोकणात तूर (Tur Intercropping) हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खाचराच्या बांधावर (Paddy Embankment) घेतले जाते. तसेच हे पीक खरीप हंगामात वरकस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किंवा मिश्र पीक म्हणून घेतले जाते. जाणून घेऊ या पिकाचे (Tur Intercropping) संपूर्ण व्यवस्थापन.

जमीन व पूर्वतयारी (Land Preparation)
तूर पिकास (Tur Intercropping) मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी, मुळे खोलवर जाऊ शकणारी भुसभुशीत जमीन मानवते. खार आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. पहिले पीक काढल्यानंतर जमीन योग्य वापशावर येताच खोल नांगरणी करावी आणि उन्हात चांगली तापू द्यावी. त्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून उत्पादकता वाढण्यास मदत होते. नांगरणी नंतर कुळवणी करून ढेकळे फोडावीत व फळी मारून जमीन समपातळीत आणावी.

लागवडीसाठी वाण (Tur Variety For Konkan)
सुधारित जातींमध्ये कोकण तूर 1, आयसीपीएल 87, टी-21, विपुला ही पिके 120 ते 155 दिवसाची असून हेक्टरी 10 ते 18 क्विंटल उत्पन्न मिळते.

कशी कराल पेरणी (Sowing Method Of Tur Crop)

  • पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास 2.5 ग्रॅम थायरम चोळावे व त्यानंतर 25 ग्रॅम रायझोबियम गुळाच्या थंड द्रावणात मिसळून लावावे.
  • तूर (Tur Intercropping) पिकाचा कालावधी तुलनात्मकदृष्ट्या इतर कडधान्य पिकांपेक्षा जास्त असल्याने पेरणी नियमित पावसाळा सुरू होताच जून महिन्यात लवकरात लवकर करावी.
  • कोकणात पेरणी उशिरा केल्यास बियांचा रुजवा योग्य प्रकारे होत नाही तसेच उत्पादनात घट येते.
  • सलग पीक घ्यायचे असल्यास हलक्या जमिनीत 60 सेंटीमीटर बाय 75 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी.
  • वाणाचा कालावधी आणि पेरणी अंतरानुसार हेक्टरी 15 ते 20 किलो बियाणे लागते.
  • तुरीच्या सलग पि‍कासाठी हेक्टरी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आवश्यकतेनुसार 50 किलो पालाश पेरणीच्या वेळी बियाण्यांच्या खाली मातीत चांगले मिसळून द्यावे.

आंतरमशागत (Intercultural Operations)
पेरणीनंतर दहा दिवसात नांगे भरावेत तसेच आवश्यकता असल्यास विरळणी करावी.

पिकात (Tur Intercropping) 15 ते 20 दिवसानंतर कोळपणी करावी तसेच एक ते दोन बेणण्या करून पीक 45 ते 60 दिवसांचे होईपर्यंत शेत तणविरहित ठेवावे.

पाणी व्यवस्थापन (Water Management In Tur Crop)
तूर हे खरीप हंगामातील पीक असल्याने ते पावसावर वाढते. पावसामध्ये जास्त काळ खंड पडल्यास सिंचन सुविधा उपलब्ध असेल तर पीक फुलोर्‍यात आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत संरक्षित पाणी दिल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते. पीक फुलोर्‍यात आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना कीड रोगापासून संरक्षण करणे आवश्यक आहे.

काढणी व साठवण (Tur Harvesting)

  • साधारणपणे 75 ते 90 टक्के शेंगा वाळल्यावर पिकाची धारदार विळ्याने कापणी करावी.
  • कापणी नंतर बांधलेल्या पेंढ्या वाळल्यावर शेंगा काठीने बडवाव्यात.
  • आणि वारवणी/उफणणी करून दाणे आणि भुसा वेगळा करावा.

उत्पादन (Tur Crop Yield)

तूर लागवडीचे योग्य व्यवस्थापन केल्यास हेक्टरी सरासरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन मिळते. साठवणीपूर्वी तूर दाणे 4 ते 5 दिवस उन्हात वाळवावे.