हॅलो कृषी ऑनलाईन: गाय दूध अनुदानाबाबत (Cow Milk Subsidy) बुधवारी मंत्रालयात राज्यातील सहकारी, खासगी दूध संघांचे प्रतिनिधी व शेतकरी संघटनांची बैठक झाली. यामध्ये राज्यातील खासगी दूध संघांनी (Milk Union Maharashtra) 30 ऐवजी 28 रुपये 50 पैशांपर्यंत अट शिथिल करण्याची मागणी लावून धरली होती. मात्र गाय दूध उत्पादक शेतकर्यांना प्रति लिटर किमान 30 रुपये अनुदान देणाऱ्यांनाच प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यावर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे ठाम आहेत. पाच रुपये अनुदान (Cow Milk Subsidy) हवे असेल तर उत्पादकांना 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ. साठी किमान 30 रुपये दर देणे बंधनकारक आहे.
मात्र, दूध संघांना ते परवडत नसल्याचे दूध संघांच्या प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले मात्र, ते अमान्य करत उत्पादकांना प्रतिलिटर 30 रुपये दिलेच पाहिजेत, यावर दुग्ध विकास मंत्री विखे-पाटील ठाम राहिले. जे एवढा दर देणार नाही, त्यांना अनुदान मिळणार नाही.
अतिरिक्त दुधाची पावडर (Milk Powder) केली जाते, त्याला दर नसल्याचे संघ प्रतिनिधींनी सांगितले. यावर, प्रति लिटर दीड रुपये रूपांतरण खर्च (Milk Conversion Charges) देता येईल का याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ, अशी ग्वाही मंत्री विखे-पाटील यांनी दिली. दूध अनुदान योजना केवळ तीन महिन्यांसाठी न राबवता पुढे सुरू ठेवण्याची मागणी शेतकरी संघटनेने (Farmer Union) केली.
शेतकरी संघटनेने केले ‘गोकुळचे’ अभिनंदन
राज्य शासनाने गाय दुधासाठी किमान दराबाबतचा अध्यादेश काढत ‘गोकुळ’ने (Gokul Milk) कार्यक्षेत्रा बाहेरील दुधाला प्रतिलिटर 30 रुपये दर देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल बैठकीत शेतकरी संघटनेच्या वतीने गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे अभिनंदन केले.
अनुदानासाठी दुग्ध विभागाला दिल्या सूचना
अनुदानापासून वंचित राहलेल्या दूध उत्पादकांची जिल्हा निहाय आकडेवारी मंत्री विखे-पाटील यांनी वाचून दाखवत सर्व दूध उत्पादकांना हे अनुदान मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत दुग्धविकास विभागास निर्देश दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील साडेसहा हजार दूध उत्पादक मागील अनुदानापासून वंचित राहलेले आहेत.