हॅलो कृषी ऑनलाईन: आपल्या वेद शास्त्रात गोवंश सांभाळ (Ideal Cow Management Practices) उत्कृष्टपणे करण्याची शिकवण श्रीकृष्ण, श्रीदत्त यांच्या प्रेरणेतून दिसून येते. भारतीय गोवंश (Desi Cow) सांभाळ सुयोग्य आणि शास्त्रीय असण्यासाठी गोविज्ञान माहित असणे आवश्यक असते.
गोवंश सांभाळण्यासाठी सुयोग्य व्यवस्थापन, ऋतुमानानुसार बदल, आवश्यक चारा पुरवठा, भरपूर पिण्याच्या पाण्याची सोय, प्रकृती संवर्धनासाठी खुराक म्हणजे पशुखाद्य, आरोग्य रक्षणार्थ लसीकरण, दररोज पुरेसा व्यायाम यागोष्टी तंदुरुस्त जीवन जगण्यासाठी गोवंशस पुरवाव्या लागतात (Ideal Cow Management Practices). शरीरस्वास्थ्य सुलभ असलेल्या गोमाता प्रजननशील असतात, तेव्हा त्यांना योग्य पैदाशीसाठी संधी पुरवाव्या लागतात.
गोनिवास/गोठा (Cowshed)
गोनिवास असणाऱ्या जागी सदैव कोरडा परिसर असल्यास गोमाता सहज बसू शकते. छताखाली प्रत्येकी 40 ते 50 चौरस फूट एवढी कोरडी जागा आणि मुक्त संचारासाठी प्रत्येकी 150 चौरस फूट जागा मिळणारी गोमाता अतिशय सुलभ व्यवस्थापनात (Ideal Cow Management Practices) असते.
गोसदनाचा केवळ सांगाडा मजबूत लोखंडी किंवा लाकडी गोल यातून साकारल्यास बाकीच्या सगळ्या बाबी फार मजबूत असण्याची गरज नसते. सौर ऊर्जा उपलब्ध करणारे छतावरचे पटल फायदेशीर ठरतात. सध्या बाजारात अगदी स्वस्त गोबर गॅस संयंत्र फायबर टाकी स्वरूपात आणि इतरत्र हलवता येणाऱ्या पद्धतीत उपलब्ध असल्याने एक गोमाता सांभाळली असली तरी गोबर गॅस सयंत्र आवश्यक समजावे.
गोमाता बसण्याच्या जागेचे महत्व (Cow Siting Area)
दिवसाकाठी 18 ते 20 तास सहज बसणारी गोमाता चांगला सांभाळत असल्याची खात्री पटते. कारण बसलेला कालावधी प्रामुख्याने रवंथ करण्यासाठी, चारा पचण्यासाठी मोलाचा ठरतो. दिवसाकाठी 14 ते 16 तास रवंत क्रिया विना व्यत्यय/ खंड/ अडथळा सुरू राहिल्यास खाल्लेल्या चाऱ्याचे पचन योग्य प्रकारे घडते. गोमाता बसण्यासाठी कोरडीच जागा निवडते, कोरड्या जमिनीची गरज बसून आरामासाठी असते, या सगळ्या बाबी महत्त्वाच्या असतात (Ideal Cow Management Practices).
ओलेपणा असणाऱ्या जागी रोगजंतू प्रादुर्भाव, संख्यात्मक वाढ, रोगप्रसार नेहमी घडत असल्याने गोवंशासाठी बसण्याची जागा कटाक्षाने कोरडीच राहील याची दक्षता घ्यावी.
गोठ्याचे वातावरण (Cowshed Atmosphere)
गायीचा संचार असलेल्या भागात निर्जंतुक वातावरण अपेक्षित असते. रोगमुक्त परिसरात हिंडता फिरणारी गाय निरोगी शरीर राखते. दिवसा पुरेपूर सूर्यप्रकाश पडणाऱ्या भागात सगळी जमीन कोरडी तर होतेच पण वातावरण निर्जंतुकीकरणातून रोगजंतू मुक्त होते. आपल्या गोनिवासाच्या ठिकाणी दिवसा जास्तीत जास्त काळ आणि जास्तीत जास्त जागेपर्यंत पोहचणारा सूर्यप्रकाश सहज उपलब्ध होईल अशा रीतीने उंच छताची रचना असावी. गोमातेसाठी उंच छत अधिक फायदेशीर असते कारण भरपूर हवा खेळती राहते. हवा खेळती, तेवढा छताखालील वास सहज दूर होतो. हवेमुळे परजीवी, माशा, कीटक, डास बाहेर फेकले जातात. खेळती हवा गोठा थंड करते, कोरडा करते आणि ताण कमी करते (Ideal Cow Management Practices).
गोठ्यात वातावरणानुसार बदल (Seasonal Changes In Cowshed)
आपल्या गोनिवासाच्या ठिकाणी अगदी सहज आणि स्वस्त किमतीत उपलब्ध असणारे भिंतीवरचे तापमापक नेहमी आवश्यक असते. वर्षभर वातावरणातील तापमान कितीही कमी अधिक झाले तरी गोनिवासात त्याची अजिबात बाधा निर्माण होणार नाही, यासाठी तापमापक उपयोगी पडते. कोणत्याही विभागात गोवंशाच्या सहज जीवन क्रमासाठी दररोज किमान 20° तर कमाल 30° एवढ्या तापमानाची गरज असते. तापमान नोंदीमुळे हिवाळ्यात गोसदन उबदार राहील, उन्हाळ्यात थंड राहील याची दक्षता घेता येते. पावसाळ्यात गोसदन कोरडे ठेवता येणे कौशल्याचे असते. जाड रेग्झिन पडदे, ताडपत्री, पुठ्ठे यातून थंड वारे थांबविता येतात. रात्रीच्या वेळी मोठे विद्युत दिवे, काळजीपूर्वक लावली जाणारी शेकोटी उपयुक्त ठरते. मुख्य बाब अशी की, पिण्याचे पाणी थोडे कोमट असेल तर गोमाता भरपूर पाणी पिऊ शकते (Ideal Cow Management Practices).
उन्हाळ्यात होणारा गोसांभाळ उष्ण हवामान आणि चारा पाण्याची कमतरता यामुळे अधिक लक्ष देण्याचा असतो. परिसर थंड राहण्याकरता मोठी उंच वृक्षसंपदा, 20 फुटापेक्षा उंच छत, छत थंड करण्याची यंत्रणा, छतास वरच्या बाजूस पांढरा रंग, छतावर तापमान रोधक गवताच्या पेंड्या, छताखाली तुषार शिंपडणारी यंत्रणा, बाजूने थंड पाणी टाकता येणारे पातळ पडदे, लांब पात्याचे पंखे उपयोगी ठरतात. उन्हाळ्यात पिण्याचे पाणी नेहमी थंड असेल तर सुयोग्य पाणी पिले जाऊन गोमातेच्या शरीरक्रिया सुलभ ठरतात.
पावसाळ्यात उघड्या, मोकळ्या आणि छत नसलेल्या जागेसाठी पारदर्शक प्लास्टिकचा मोठा पडदा छत म्हणून वापरल्यास त्याखालील जमीन कोरडी राहून गोजीवन सुसह्य होते.
दैनंदिन व्यवस्थापनात आपत्ती कधीतरी अपघाती स्वरूपात दिसून येतात. वावटळ, वादळ, गारपीट, अवकाळी पाऊस, उष्णतेच्या लाटा, ढगफुटी, आगी आणि महापूर यासगळ्या अडचणी सोडवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आणि त्यासाठी शासकीय संपर्क यंत्रणा माहित असणे आवश्यक असते. अत्यावश्यक मदतीच्या वेळी सहकार्य मिळवण्यासाठी सजग करणारी ध्वनिक्षेपक यंत्रणा उपयोगाची ठरते (Ideal Cow Management Practices).