हॅलो कृषी ऑनलाईन भारतीय कृषी संशोधन संस्थेने (IARI) धानाच्या 9 नवीन जाती (New Rice Varieties) विकसित केल्या आहेत. वेगवेगळ्या हवामानात पिकवता येणाऱ्या या जाती शेतकऱ्यांना (Farmers) अधिक उत्पादन (High Production Rice Varieties) देणाऱ्या आहेत. भारतीय शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पादनात नवीन क्रांती घडवून आणण्यात या वाणांचा मोठा वाटा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच शेत आणि बागायती पिकांच्या 109 वाणांचे प्रकाशन केले. यामध्ये या 9 धानाच्या जातींचाही (New Rice Varieties) समावेश करण्यात आला होता. जाणून घेऊ या वाणांची वैशिष्ट्ये.
धानाच्या नवीन जाती (New Rice Varieties)
CR 101 (IET 30827)
ही जात मध्यम उंचीच्या जमिनीसाठी विकसित करण्यात आली आहे. 125 ते 130 दिवसात ही जात तयार होत असून हेक्टरी 47.20 क्विंटल उत्पादन मिळू शकते. क्षारीय जमीन, क्षारयुक्त जमीन आणि सामान्य स्थितीत त्याचे प्रति हेक्टर उत्पादन अनुक्रमे 35.15, 39.33 आणि 55.88 क्विंटल असू शकते. ही जात हरियाणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांमध्ये लागवडीसाठी योग्य मानली गेली आहे.
CR 416 (IET 30201)
CR 416 (IET 30201) ही जात (New Rice Varieties) 125 ते 130 दिवसात कापणीसाठी तयार होतात. ही जात तपकिरी ठिपके, मानमोडी, कडा करपा, तांदूळ तुंग्रो रोगास काही प्रमाणात प्रतिरोधक आहे. तपकिरी आणि हिरवे नाकतोडे, आणि खोड पोखरणारी अळीस प्रतिरोधक आहे. धानाची ही जात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि गुजरातच्या किनारी क्षारपड भागासाठी योग्य असल्याचे आढळून आले आहे. धानाच्या या जातीचे प्रति हेक्टरी 48.97 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
स्वर्णपूर्वी धान 5 (IET 29036)
ही जात दुष्काळात थेट पेरणीसाठी योग्य असल्याचे आढळून आले आहे. यात जस्त (25.5 पीपीएम) आणि लोह (13.1 पीपीएम) जास्त प्रमाणात असते. ही जात 110 ते 115 दिवसांत पक्व होते. धानाची ही जात मानमोडी आणि खोडकूज रोगास प्रतिरोधक आहे. तर पानावरील करपा, तपकिरी ठिपके आणि कडा करपा रोगास काही प्रमाणात प्रतिरोधक आहे.
याशिवाय ही जात (खोड पोखरणारी अळी (Stem Borer) सुरळीतील अळी आणि पाने गुंडाळणारी अळी, फुलकिडी यांसारख्या प्रमुख किडींना सहनशील आहे. खरीप हंगामात पावसावर आधारित आणि पाण्याची कमतरता असलेल्या क्षेत्रासाठी प्रति हेक्टर उत्पादन सामान्य परिस्थितीत 43.69 क्विंटल/हेक्टरपर्यंत आणि मध्यम दुष्काळी परिस्थितीत 29.02 क्विंटल/हेक्टरपर्यंत मिळू शकते.
धान CR – 810 (IET 30409)
हे वाण (New Rice Varieties) 150 दिवसात तयार होते. सुरुवातीच्या अवस्थेत 14 दिवसांपर्यंत पाणी साचण्यच्या अवस्थेस सहनशील आहे, तपकिरी डाग रोगास माफक प्रमाणात प्रतिरोधक आहे. पाने गुंडाळणारी अळी आणि खोड पोखरणारी अळीस काही प्रमाणात प्रतिरोधक आहे. ही जात प्रति हेक्टरी 42.38 क्विंटल उत्पादन देते. या जातीला ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आसामसाठी शिफारस करण्यात आली आहे.
CR धान 108 (IET 29052)
हे वाण कोरडवाहू भागासाठी योग्य आहे. या वाणाची लवकर थेट पेरणी केली जाते. 110 ते 114 दिवसांत तयार होते. ही जात तपकिरी ठिपके या रोगास आणि लीफ कर्लर आणि स्टेम बोरर किडीस प्रतिरोधक आहे. नाकतोडे किडीस आणि दुष्काळासाठी काही प्रमाणात सहनशील आहे. ही जात हेक्टरी 34.46 क्विंटलपर्यंत उत्पादन देते. बिहार, ओडिशा राज्यासाठी शिफारस करण्यात आलेली आहे.
DRR भात 73 (IET 30242)
ही जात 120 ते 125 दिवसांत पक्व होते. ही जात खरीप आणि रब्बी या दोन्ही पिकांसाठी ओलिताखालील आणि पावसावर अवलंबून असलेल्या उथळ सखल प्रदेशासाठी योग्य आहे. उत्पादन 60 क्विंटल प्रति हेक्टर (सामान्य स्थितीत; स्फुरद 60 किलो प्रति हेक्टर शिफारशीत प्रमाणात लागू करा), 40 क्विंटल प्रति हेक्टर (कमी फॉस्फरस अंतर्गत; 40 किलो प्रति हेक्टर) असे मिळू शकते. ही जात पानावरील करपा रोगास काही प्रमाणात प्रतिरोधक आहे. ओडिशा, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यासाठी शिफारस करण्यात आली आहे.
DRR भात 74 (IET 30252)
हा वाण खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांसाठी कमी फॉस्फरस असलेल्या मातीसाठी तसेच कोरडवाहू आणि बागायती दोन्हीसाठी योग्य आहे. उथळ सखल प्रदेशासाठी योग्य आहे. ही जात 130 ते 135 दिवसांत पक्व होते. ही जात पानावरील करपा, मानमोडी, कडा करपा या रोगासाठी आणि नाकतोडे या किडीला काही प्रमाणात सहनशील आहे. ही जात प्रति हेक्टर 70 क्विंटल पर्यंत उत्पादन देते. ही जात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, झारखंड आणि भारतातील फॉस्फरसची कमतरता असलेल्या भागासाठी शिफारस करण्यात आलेली आहे.
DRR भात 78 (IET 30240)
ही जात 120 ते 125 दिवसात पक्व होते. सामान्य परिस्थितीत प्रति हेक्टर 58 पर्यंत उत्पादन देते. ही जात पानांवरील करपा रोगास आणि नाकतोडे किडीस काही प्रमाणात प्रतिरोधक आहे. ही जात कर्नाटक आणि तेलंगणासाठी शिफारशीत आहे.
KKL (R) 4 (IET 30697) (KR 19011)
ही जात (New Rice Varieties) पूरसदृश परिस्थितीसाठी योग्य आहे. 120 ते 125 दिवसांत तयार होते. या वाणापासून कठीण परिस्थितीत हेक्टरी 38 क्विंटल आणि सामान्य परिस्थितीत 56 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते. ही जात तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पुद्दुचेरीसाठी शिफारशीत आहे.