हेलो कृषी ऑनलाईन : बरेच पशुपालक आपल्या जनावरांना गुळ (Cattle Feed Jaggery) खाण्यासाठी देतात. गुळामध्ये कॅल्शियम जास्त असते असे, अनेक पशुपालकांना वाटते. परंतु गुळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण किती असते व तो किती व कधी खायला द्यावा, याबाबत जाणून घेऊया.
गुळामध्ये (Cattle Feed Jaggery) असणारे अन्नघटक
गुळामध्ये 80 टक्के सुक्रोज, 10 टक्के ग्लुकोज व फ्रुक्टोज, 5 ते 7 टक्के पाणी आणि उरलेले 3 टक्के क्षार घटक असतात.
100 ग्रॅम गुळामध्ये 40 ते 100 मि.ग्रॅ. कॅल्शियम असते. म्हणजे 1 किलो गुळ जनावरांना खाऊ (Cattle Feed Jaggery) घातल्यास फक्त 1 ग्रॅम कॅल्शियम मिळते. त्याचबरोबर मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम यांचे देखील प्रमाण 30 ते 100 मि.ग्रॅ प्रति 100 ग्रॅम असते. लोह 10-13 मि.ग्रॅ. प्रति 100 ग्रॅम असते.
दुधाळ जनावरांना 20 ते 25 मि.ग्रॅ. लोह आवश्यक असते. त्यामुळे गुळामधून जनावरांना (Cattle Feed Jaggery) लोह चांगल्या प्रमाणात मिळते. परंतु हा गुळ लोखंडाच्या कढईत पारंपरिक पद्धतीने बनवला असेल तरच त्या गुळामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. गुळातील अन्नघटकाचा विचार केला तर गुळामधून जनावरांना कॅल्शियम नगण्य प्रमाणात मिळते.
जनावरांना गुळ खायला द्यावा की नाही?
गुळामध्ये शर्करेचे प्रमाण जास्त असल्याने जनावरांना थोड्या प्रमाणात गुळ खायला दिल्याने लगेच ऊर्जा मिळते. परंतु जनावरांना गरजेपेक्षा जास्त म्हणजे 200 ग्रॅम पेक्षा जास्त गुळ खायला दिला आणि त्याचबरोबर सकस हिरवा चारा दिला तर जनावरांच्या पोटामध्ये शर्करेचे प्रमाण वाढते. पोटातील जिवाणू लॅक्टीक असिड मोठ्या प्रमाणावर तयार करतील, त्यामुळे असिडोसिस होण्याची शक्यता असते. असिडोसिसमुळे जनावरांचे पचन बिघडते. त्यामुळे जनावरांना गरज असेल तरच व प्रमाणात गुळ देणे महत्त्वाचे आहे.
जनावरांना गुळ कधी खाऊ घालावा?
जनावरे विल्यानंतर जनावरांना मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळणे गरजेचे असते. कारण जनावर विण्याच्या अगोदर कमी प्रमाणात चारा खाते किंवा चारा खात नाही. वासराचे वजन जनावराच्या कोटीपोटावर पडल्यामुळे जनावराची चारा खाण्याची व रवंथ करण्याची क्षमता कमी झालेली असते. जनावर विल्यानंतर गर्भाशयातून रक्तस्राव होतो त्यामुळे जनावरे व्यायलानंतर जनावराला लवकर ऊर्जा मिळण्यासाठी गुळ खायला देणे फायदेशीर असते.
गुळ कसा खायला द्यावा?
जनावर व्यायल्यानंतर कोमट पाण्यामध्ये 200 ग्रॅम गुळ विरघळवून जनावरांना द्यावा. त्याचबरोबर 200 ते 250 ग्रॅम तृणधान्याच्या लापशीमध्ये 100 ग्रॅम गुळ घालून व्यायलेल्या जनावराला द्यावा. जनावरांना बनवलेल्या लापशीमध्ये 200 ते 250 ग्रॅमपेक्षा जास्त तृणधान्याचे प्रमाण असू नये.
गुळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण हे फार कमी असते, त्यामुळे जनावरांमधील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी गुळाचा वापर करू नये.