हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राने विस्तार कार्यात डिजिटलायझेशनचा वापर करत शेतकऱ्यांना पिकांची माहिती त्यांच्या मोबाईलवर सहजासहजी उपलब्ध व्हावी यासाठी क्यूआर कोडची संकल्पना मांडली आहे. या माध्यमातून विविध फळांचा व भाजीपाल्याची लागवड ते काढणी आणि विक्री पर्यंत ची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर संबंधित पिकाचा किंवा आर कोड स्कॅन केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात उपलब्ध होते.
कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर लालासाहेब तांबडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आहे. कृषी विज्ञान केंद्राने जिल्ह्यातील दत्तक घेतलेल्या 70 गावातील शेतकरी सध्या या सुविधेचा लाभ घेत आहेत. त्यासाठी संबंधित पिकांची माहिती असणारे किंवा आर कोड चे खास डिजिटल पोस्टर तयार केले आहेत. त्यावर संबंधित पिकाचे नाव त्याचे छायाचित्र आणि खाली कोड आहे. आपल्याला हवा तो कोड मोबाईल वर स्कॅन केला की तात्काळ त्याची माहिती उपलब्ध होते. पूर्वी कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांना विविध पिकांच्या माहितीसाठी घडी पुस्तिका माहितीपत्रक पुरवले जात होते पण आता थेट मोबाईल वरच ही सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे.
या क्यू आर कोड च्या माध्यमातून सिमला मिरची, कांदा, शेवगा, भेंडी या फळभाज्या कलिंगड आणि खरबूज ही फळं तर सोयाबीन, तूर, हरभरा, मका या प्रमुख धान्य पिकांची माहिती उपलब्ध आहे. त्याशिवाय शेळीपालन दुग्ध व्यवसायाला पूरक उद्योगासह ज्वारी आणि सोयाबीनच्या प्रक्रिया उद्योगाच्या माहितीचाही समावेश आहे.