Agriculture Pipeline : पाईपलाईनसाठी अडवणूक होतीये का? करा.. हा अर्ज; पुन्हा कोणीही नडणार नाही!

Agriculture Pipeline Oppose Farmer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या उन्हाळ्याचे दिवस (Agriculture Pipeline) जसजसे जवळ येत आहेत. तसतसे काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी पाईपलाईन करण्याची योजना आखण्यास सुरुवात केली असेल. उन्हाळ्यात रान मोकळे राहत असल्याने, शेतीसाठी या कालावधीत पाईपलाईन करण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र, कधी-कधी आपली पाईपलाईन ज्या मार्गाने जाणार असेल. त्या मार्गावरील एखादा आडमुठ्या शेतकरी आपल्याला नडतो. तो आपली पाईपलाईन त्याच्या शेतातून जाऊन देत नाही. अशावेळी पाईपलाईन (Agriculture Pipeline) करणारा शेतकरी चिंतेत पडतो. इतकेच काय तर या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये हाणामाऱ्या देखील होतात.

मात्र, एखाद्या शेतकऱ्याला आपल्या शेतीसाठी पाईपलाईन (Agriculture Pipeline) दुसऱ्याच्या शेतातून न्यायची असेल तर त्याची कोणीही अडवणूक करू शकत नाही. याबाबत कायदा खंबीर असून, तुम्ही तहसीलदारांना केवळ एक अर्ज देऊन, आपल्या पाईपलाईनच्या जाणाऱ्या मार्गातील अडथळा दूर करू शकतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेतीसाठीच्या पाईपलाईनसाठी अडवणूक झालयास काही कायदा आहे का? या कायद्याच्या माध्यमातून तुम्ही शेतातून पाईपलाईन जाऊन न देणाऱ्याला कसे शांत करू शकता? याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

पाईपलाईनसाठीचा कायदा? (Agriculture Pipeline Oppose Farmer)

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 कलम 49 नुसार दुसऱ्याच्या मालकीच्या जमिनीमधून पाईपलाईन, पाट, जलमार्ग बांधण्यासंबंधीचे अधिकर शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तुमची अडवणूक करणाऱ्या आडमुठ्या शेतकऱ्याविरोधात तुम्ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 कलम 49 नुसार तहसीलदारांना अर्ज करू शकतात. हा अर्ज तुम्हाला डिजिटल ग्राहक सेवा केंद्रावर अर्ज सहज उपलब्ध होऊन जातो.

कोणती कागदपत्रे लागतात?

कलम 49 नुसार तुम्हाला हा अर्ज भरायचा असून, यासाठी तुम्हाला जमिनीचा कच्चा नकाशा, तुमचा सातबारा जोडायचा आहे. याशिवाय तुमची पाईपलाईन कुठून कुठपर्यंत जाणार आहे. याची संपूर्ण माहिती विस्तृतपणे भरावी लागणार आहे. अर्जात तुम्हाला अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे (एक असेल एक), गट क्रमांक याची माहिती भरावी लागणार आहे. यानंतर तहसील कार्यालयाकडून तुमच्या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर, संबधित शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या जातात. आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना कायदेशीर समज दिली जाते. आणि तुमचा पाईपलाईन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला जातो.

कोणतेही नुकसान होऊ नये

मात्र, असे करताना पाईपलाईन करणाऱ्या शेतकऱ्याला देखील कायद्याने काही अटी ठेवल्या आहेत. ज्या शेतकऱ्याच्या शेतातून पाईपलाईन नेत आहात, अशा शेतकऱ्याचे कमीत-कमी नुकसान होईल किंवा कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. असे कायद्यात म्हटले आहे. असे असले तरी कोणत्याही परिस्थितीत एखाद्या शेतकऱ्याला पाईपलाईन करण्यासाठी अडवले जाऊ शकत नाही, हे कायदा स्पष्टपणे अधोरेखित करतो.