Bajari Farming : बारामती (जि. पुणे) तालुक्यातील वाघळवाडी येथील सतीशराव सकुंडे या प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये यंदा नऊ एकर क्षेत्रामध्ये ४ जुलै रोजी सोयाबीन व तुर्की देशातील बाजरीचे आंतरपीक घेतले आहे. या तुर्की बाजरी पिकाला तब्बल तीन फूट लांब कणीस लागले आहे. यातून श्री. सकुंडे यांना भरघोस उत्पादन मिळणार आहे.
बियाणे कुठून मिळाले
सतीशराव सकुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथून त्यांना तुर्की बाजरीचे बियाणे उपलब्ध झाले. त्यांनी सोयाबीन या पिकाबरोबर आंतरपीक म्हणून तुर्की बाजरी पीक घेतले आहे.
लागवड कशी करावी
पेरणी पद्धतीसाठी बाजरीचे एकरी एक किलो बियाणे लागते. दोन फुटाची सरी काढून टोकन पद्धतीने लागवड केल्यास बाजरीचे बियाणे कमी लागते, असे श्री. सकुंडे यांनी सांगितले.
तुर्की बाजरीची वैशिष्ट्ये काय आहेत?
तुर्की बाजरीच्या कणसाची लांबी तब्बल तीन फूट आहे. या बाजरीच्या कणसाला कूस असते. कूस असल्यामुळे पक्ष्यांपासून संरक्षण होते. सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव होत असतो. पक्षी बाजरी खाण्यासाठी आल्यानंतर सोयाबीन पिकावरील किडी खातात, त्यामुळे आंतरपीक म्हणून फायदा होतो. सोयाबीन पिकाबरोबर तुर्की बाजरीचे आंतरपीक जोमदार आले असून यातून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांना आहे.
उत्पादन किती मिळते?
तुर्की बाजरीचे एकरी 40 क्विंटल उत्पादन मिळते. दुष्काळी परिस्थितीमध्ये कमी दिवसात येणारे बाजरीचे पीक हे फायदेशीर ठरते. तसेच सोयाबीन हे आंतरपीक असल्याने सोयाबीनचे 15 क्विंटल उत्पादन मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.
श्री. सकुंडे यांनी केलेल्या प्रयोगाचे परिसरातून कौतुक होत आहे. अनेक शेतकरी त्यांच्या शेतातील बाजरी पीक पाहण्यासाठी येत आहेत. तुर्की देशातून येणारे बियाणे प्रति किलो दीड हजार रुपये या दराने श्री. सकुंडे यांनी खरेदी केले आहे. मात्र शेतकऱ्यांना तुर्की वाणाचे बियाणे कमी दराने उपलब्ध करून दिले जाईल, असे सतीश सकुंडे यांनी सांगितले.