Blue Tongue Disease: शेळ्या मेंढ्यांना होणारा ‘निळी जीभ’ आजार; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: जनावरांना होणारा निळी जीभ आजार (Blue Tongue Disease) प्रामुख्याने विशेषतः ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात होतो. हा रोग मुख्यतः शेळ्या आणि मेंढ्यांना (Sheep And Goat Disease) होतो, गुरेढोरे फार क्वचितच या आजाराने प्रभावित होतात. विषाणूमुळे होणारा हा रोग संसर्गजन्य नसला तरी एक वर्षाच्या वयोगटातील कोवळ्या शेळ्या (Goat) मेंढ्यांना (Sheep) या रोगाचा धोका असतो. दूध पिणारी कोकरू तुलनेने या रोगास प्रतिरोधक असतात. जाणून घेऊ या आजाराची (Blue Tongue Disease) कारणे, लक्षणे आणि त्यावत उपाय.

निळी जीभ आजाराची कारणे (Blue Tongue Disease Causes)

ओरबीव्हायरस नावाच्या विषाणूमुळे हा रोग होतो. पावसाळ्यातील रक्त शोषणाऱ्या कीटकापासून या रोगाचे विषाणू पसरतात. डासामार्फत सुद्धा या रोगाचा प्रसार होतो. वीर्य आणि प्लेसेंटल मार्गाद्वारे सुद्धा संक्रमण होऊ शकते.  

निळी जीभ आजाराची लक्षणे (Blue Tongue Disease Symptoms)

या आजारात (Blue Tongue Disease) जनावरांना ताप येतो, नाकातून स्त्राव येऊन नाक लाल होते, सुजते. तोंडातून लाळ येऊन जीभ काळी- निळी पडते. खुरांना सूज येते व ते लंगडायला लागतात. दुर्गंधीयुक्त अतिसार होऊन जनावरे मलूल होतात. जनावरांना श्वास घ्यायला त्रास होतो, ते घोरतात. श्वसनक्रिया बंद पडल्यास मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

आजारावर प्रथमोपचार व उपचार (Blue Tongue Disease Treatment)

  • सर्वात प्रथम आजारी जनावरांना वेगळे करावे व त्यांना सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावे.
  • बाधित जनावरांना पुरेशी विश्रांती द्यावी, चरायला पाठवू नये.
  • बाधित जनावरांना तांदूळ, नाचणी, यांची लापशी खाऊ घालावी.
  • जनावरांच्या व्रणावर/अल्सरवर ग्लिसरीन लावावे.
  • तोंडातील अल्सरवर खारट पाण्याने उपचार केले जाऊ शकतात किंवा 1 ग्रॅम पोटॅशियम परमँगनेट 1 लिटर पाण्यात मिसळून दिवसातून 2 ते 3 वेळा या द्रावणाने तोंड धुवावे.
  • बाधित मेंढ्यांना प्रतिजैविक देण्यासाठी किंवा लक्षणात्मक उपचारांबाबत पुढील सल्ल्यासाठी तुमच्या जवळच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधावा.

प्रतिबंधात्मक उपाय

  • नियमित अंतराने जनावरांचे योग्य लसीकरण करावे.
  • रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातून जनावरांची आयात टाळावी.