हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना पीएम किसान सम्मान निधि योजना…. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट दोन हजार रुपये पाठवले जातात. या योजनेचा दहावा हप्ता डिसेंबर महिन्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र अद्यापही हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. पण आता येत्या नवीन वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा दहावा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन वर्षात मोदी सरकार कडून मोठ्या गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवे वर्ष 2022 मधील जानेवारी महिन्यात पंतप्रधान किसान योजनेचा दहावा हप्ता जारी करण्याची शक्यता आहे. याची तयारी कृषी मंत्रालयात पूर्ण झाली असून शेतकऱ्यांना दिली जाणारी रक्कम सुमारे 22 हजार कोटी रुपये असू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना 1.61 लाख कोटी रुपयांची रक्कम जारी करण्यात आली आहे. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा आधार मिळाला आहे. सध्या शेतकऱ्यांना 31 मार्च पर्यंत दहावा हप्ता मिळू शकतो.
शेतकरी रब्बी पिकांची कामे पूर्ण करु शकतील
नव्या वर्षात पी एम किसान योजनेचा दहावा हप्ता जारी झाल्यास शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी मोठी मदत होणार आहे. रब्बी पिकासाठी ते त्याचा उपयोग करू शकतात. गहू आणि मोहरीच्या पेरणीनंतर देशातील बहुतांश शेतकरी दोन हजार रुपयांच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते पैसे मिळाले तर शेतकरी खत आणि पाण्याचे काही व्यवस्था करू शकतील. पी एम किसान निधी चे पैसे जारी करण्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी उत्पादक संघटनांना एकत्र अनुदान देखील जारी करण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यानो ई – केवायसी महत्वाची
या योजनेमध्ये सहभागी होत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना ऑनलाईन केवायसी करणं अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. जर तुम्ही अद्यापही ई-केवायसी केली नसेल तर ती त्वरित करून घ्या कारण ही केवायसी झाल्यानंतरच तुम्हाला पी एम किसान योजनेचा दहावा हप्ता मिळणार आहे. याकरिता तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तिथे तुम्ही तुमची ई-केवायसी अपडेट करू शकता. या योजनेचा लाभ घेऊ शकता. तसेच पी एम किसान योजनेच्या हेल्पलाईनवर 155261 किंवा 011 – 24 30 0606 या क्रमांकावर देखील संपर्क साधू शकता.