हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी जून महिन्यात पावसाने ओढ दिली त्यामुळे खरीप हंगामाबाबत शेतकरी चिंतेत होता. मात्र जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. मागच्या आठ दिवसात मात्र राज्यभरात मोठा पाऊस झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्मण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार आणि तिबार पेरणीची वेळ आली आहे. जमीन खरडून गेल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईच्या मागणीसाठी अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या वेळी विभागीय कृषी सहसंचालकांना शेतकऱ्यांनी जाब सुद्धा विचारला.
निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट
माजी जिल्हापरिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. याबाबत प्रकाश साबळे यांनी सांगितले, जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने बियाणे उगवलेच नाहीत, निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा दुबार पेरणीचे संकट ओढवले आणि आता अतिवृष्टी तसेच पुरामुळे पेरलेले बियाणे वाहून गेल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवल्याचे त्यांनी सांगितले.
नुकसान भरपाईची मागणी
अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस आदी बियाणे जमिनीत दडपून गेले असून शेतकरी चिंतातूर झाले आहेत. आर्थिक दृष्टीने शेतकरी पूर्णपणे खचले असून झालेल्या नुकसानाची त्वरित भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. या वेळी प्रकाश साबळे, शेखर अवघड, समीर जवंजाळ, सचिन ठाकरे, विनायक टिपरे, ऐनुल्ला खान, उमेश वाकोडे, अक्षय साबळे, किरण महल्ले, योगेश बुंदिले, कार्तिक देशमुख, अतुल ढोके, सतीश खुळे, विशाल किटुकले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.