हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या 1 जूनपासून इअर टॅग (Ear Tagging) (बिल्ला) नसलेल्या पशुधनाची खरेदी-विक्री करता येणार नाही, तसेच बैलगाडा शर्यतीत सहभाग घेता येणार नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात आतापर्यंत गाई व म्हशींचे टॅग करण्याची प्रक्रिया 114 टक्के पूर्ण झाली आहे. अशी माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने शेळ्या व मेंढ्यांचे 72 टक्के टॅग पूर्ण झाले असून, राज्यातून एकूण 2 कोटी 44 लाख पशुंचा (Ear Tagging) यात समावेश करण्यात आला आहे.
पशुवैद्यकीय सेवा मिळणार नाही (Ear Tagging Compulsory For Farmers)
नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन (एनडीएलएम) अंतर्गत ‘भारत पशुधन प्रणाली’मध्ये इअर टॅगिंग (Ear Tagging) केलेल्या सर्व पशुधनाच्या सर्वकष नोंदी घेण्यात येत असून, शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाचे इअर टॅगिंग करून घेणे बंधनकारक केले आहे. इअर टॅगशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यामधून कोणतीही पशुवैद्यकीय सेवा देण्यात येऊ नये. तसेच कत्तलखान्यात टॅग असल्याशिवाय म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात येऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नुकसान भरपाई मिळणार नाही
नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्यपशुंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येऊ नये. कोणत्याही पशुधनाची वाहतूक इअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही, तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर उचित कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जनगणना संख्येपेक्षा जास्त टॅग
राज्यात 2019 च्या पशुगणनेनुसार 1 कोटी 39 लाख 92 हजार 304 म्हशी असून, आतापर्यंत 62 लाख 29 हजार 509 म्हशींचे टॅगिंग पूर्ण झाले आहे. तर 56 लाख 3 हजार 692 गाई असून आतापर्यंत 1 कोटी 62 लाख 83 हजार 512 जनावरांचे टॅगिंग झाले आहे. ही संख्या जनगणना संख्येपेक्षा जास्त आहे. शेळ्या व मेंढ्यांमध्ये टॅगिंग करताना कळपातील एका नराला बिल्ला लावला जात असून, त्या कळपातील अन्य जनावरांची केवळ नोंदणी केली जात असल्याने ही संख्या जास्त असल्याचे पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे.