Cotton : शेतकऱ्याने 2 एकर कपाशीवर फिरवले रोटाव्हेटर, दुबार पेरणी नंतरही पिके बहरत नसल्याने शेतकरी चिंतेत

Cotton Jalgaon News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव (Cotton) : जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसाअभावी शेतातील पिकांची उंची खुंटली आहे. तर दुबार पेरणी नंतरही पिकांची आवश्यक वाढ होत नसल्याने चित्र आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, अशाच हताश झालेल्या शेतकऱ्याने २ एकर कपाशीवर रोटाव्हेटर फिरवले आहे.

कजगाव (ता. भडगाव) येथील शेतकरी अनिल दशरथ महाजन यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात लागवड केलेल्या कपाशी पिकावर रोटाव्हेटर फिरवले आहे. महाजन यांनी आपल्या शेतात कपाशीची लागवड केली होती. मात्र, तिची आवश्यक वाढ होत नसल्याने हताश होऊन त्यांनी रोटाव्हेटर फिरवले. पावसाअभावी महाजन यांनाच नव्हे तर अनेक शेतकऱ्यांना उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. परिसरात अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागत आहे. तर दुबार पेरणी नंतरही पिके बहरत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तर होणारे नुकसान पाहता शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत.

५० ते ६० टक्यापर्यंत नुकसान होण्याची शक्यता

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. यामुळे शेतातील पिके कोमेजून जात असून अनेक पिके पाणी नसल्याने लाल होण्याचे प्रमाण वाढले आहे. पिकांची वाढ खुंटली आहे. ही मोठी चिंताजनक बाब आहे. त्यातच पावसाच्या लहरींपणामुळे पिकांची खुंटलेली वाढ व इतर नुकसान पाहता जवळपास ५० ते ६० टक्क्याहून अधिक नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मेहनत व पैसे गेले वाया

पिकांची ऊंची खुंटल्याने हाती उत्पन्न येण्याची शक्यता मावळली होती. त्यामुळे पिकामध्ये रोटाव्हेटर फिरवण्याचा हा निर्णय घ्यावा लागला. कपाशीवर रोटाव्हेटर फिरवल्याने बियाणे व लागवडीसाठी लागणारी मेहनत तसेच वेळ व पैसे वाया गेल्याने मोठे नुकसान सोसावे लागले आहे, असे शेतकरी अनिल महाजन यांनी सांगितले.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.