शेतकऱ्यांनो सावधान ! खतात चक्क ‘मिठा’ ची भेसळ…

Fertilizer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे शेतकरी खरिपाच्या कामात व्यस्त असताना शेतकऱ्यांना खतांची गरज भासते. मात्र असे असताना भेसळयुक्त खते बाजारात असल्याची माहिती समोर अली आहे. खत उद्योगातील प्रसिद्ध ब्रँड असलेल्या खताची हुबेहूब नक्कल करीत १२ : ६१ : ० या विद्राव्य खतामध्ये चक्क मिठाची भेसळ केल्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापुरात खतामध्ये मिठाची भेसळ असल्याचे लक्षात आल्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने या खताच्या बॅगा आणि त्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. तसेच पोलिसांकडे फिर्यादीही दाखल केल्या आहेत. पण एकूण सर्व प्रकार पाहता खताच्या या भेसळीत टोळी कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान मागील आठवड्यात एका शेतकऱ्याने पुणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाला फोन करून त्यासंबंधीची तक्रार दिली होती. मोहोळ येथे बनावट १२ : ६१ : ० या विद्राव्य खताची विक्री होत असून, तक्रारदाराने स्वतः दोन बॅग खरेदी केल्याचेही सांगितले होते. त्यानुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी अशोक पवार यांनी पुण्यातून येऊन पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. त्यासंबंधी रीतसर फिर्यादही दिली. त्यानंतर वैभव काळे (रा. मोहोळ) व राहुल शेंडगे (रा. ढोकबाभुळगाव, ता. मोहोळ) या संशयितांवर गुन्हा दाखल करत चौकशीसाठी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.

मोहोळ येथील प्रकरणात वैभव काळे याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केली, तेव्हा मोहोळमध्ये नाईकवाडी वस्ती येथे पत्रा शेडमध्ये बनावट खत तयार करून त्याची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. तिथे मिठाच्या काही गोण्याही आढळल्या. त्याच्याकडे त्याबाबत विचारणा केली असता, हे मीठच आपण एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या पोत्यात भरून विक्री करत असल्याचे त्याने सांगितल्याचे तंत्र अधिकारी अशोक पवार यांनी सांगितले.